मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । सामाजिक, आर्थिकदृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज घटक आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मातंग समाजात देखील मोठे परिवर्तन होत असून समाजातून अनेक साहित्यिक व कलासंपन्न लोक पुढे येत आहेत. या समाजाची अशीच प्रगती झाल्यास त्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांचे साहित्य जगभर वाचले जाते असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांसारखे महापुरुष निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राजभवन, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते साहित्य, लोककला व समाजसेवा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना ‘मातंग समाजमित्र’, ‘मातंग समाजरत्न’ व ‘विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

गेल्या काही वर्षांमध्ये समाजातील मागास घटकांच्या विकासासाठी देशात कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक घरी वीज, शौचालय व नळाचे पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मातंग समाजासह सर्व मागास समाज घटकांचा विकास होऊन त्यातून सक्षम नेतृत्व पुढे येईल, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी हभप भगवान बाबा आनंदगडकर व भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांना मातंग समाजमित्र पुरस्कार देण्यात आले. तर साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना विशेष कार्याकरिता मातंग समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्याबद्दल प्रा. अरुण आंधळे, राजन लाखे, डॉ.अशोक कांबळे, प्रा. ईश्वर नंदापुरे, सुनील वारे, डॉ. संजय देशपांडे, शाहीर नंदेश उमप, लोकगायिका राधिका खुडे आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंचावर हभप शिवाजीराव मोरे, डॉ. रमेश पांडव, डॉ. अंबादास सगट व मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!