फलटण ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.३०: झिरपवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण-गिरवी रोडवर सुमारे २५ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या, सध्या बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालय इमारतींची दुरावस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीला तत्वतः पाठिंबा देत पाहणी करुन त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.

सातारा जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण ग्रामीण रुग्णालयाचा विषय मांडताना आपण यापूर्वी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत प्रस्ताव दाखल केला असून फलटण, माण, खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी तेथे सुसज्ज रुग्णालय पुन्हा उभारण्याची मागणी केल्याचे निदर्शनास आणून देत सुमारे ८ एकर जागेवर रुग्णालय मुख्य इमारत, अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने व अन्य इमारती उभारण्यात आल्या आहेत, पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र योजना उभारुन सुरु करण्यात आली मात्र दुर्दैवाने सदर रुग्णालय सुरु झाले नाही, आता त्याबाबत ठोस निर्णय घेऊन ते त्वरित सुरु करावे अशी आग्रही मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठकीत केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरीलप्रमाणे स्पष्ट निर्देश संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज (शनिवार) खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बंद अवस्थेतील ग्रामीण रुग्णालय इमारतीची पाहणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता मुंगीलवार, सहाय्यक अभियंता महेश नामदे, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. शुक्ला यांनी केली. त्यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, स्वराज पत संस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष नानासाहेब ईवरे, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्य रवि टेंबरे, शिवा गुंजवटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार रुग्णालयासाठी ७.८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत सदर रुग्णालय शासन पूर्ण क्षमतेने चालविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या आढावा बैठकीत सांगितले आणि आज तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने पाहणी केल्याने ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्याचे जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी सदर इमारतीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक गतवर्षी तयार करण्यात आले त्यावेळी ते १ कोटी २५ लाख रुपयांचे होते आता त्यामध्ये २० % वाढ अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!