स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशामधील सर्व नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजना सुरू करणार आहेत. सार्वत्रिक आरोग्य सुविधांचे कवच आणि आर्थिक जोखीम संरक्षण उपलब्ध करण्यावर आणि सर्व व्यक्तींना आणि समुदायांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर या योजनेचा भर राहील. केंद्रीय गृहमंत्री आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल यावेळी उपस्थित असतील.
ही योजना जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांना मोफत विमा संरक्षण देईल. आजारपणात प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक पाठबळ या योजनेच्या माध्यमातून मिळेल. यामुळे पीएम-जयचा अतिरिक्त 15 लाख कुटुंबांपर्यंत विस्तार झाला आहे. पीएम-जय सोबत ही योजना विमा योजनेच्या स्वरुपात काम करेल. देशभरात या योजनेचे फायदे लागू राहतील. पीएम-जय योजने अंतर्गत नोंदीत असलेल्या रुग्णालयांमध्ये या योजनेच्या माध्यमातून देखील सेवा देण्यात येतील.
सार्वत्रिक आरोग्य छत्र मिळवताना
सार्वत्रिक आरोग्य छत्रामध्ये अत्यावश्यक, दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्याच्या प्रचारापासून प्रतिबंध, उपचार, पुनर्वसन आणि शुश्रूषा अशा सर्व सुविधांचा समावेश आहे आणि प्रत्येकाला सर्व सेवा उपलब्ध करण्यावर, आरोग्य सुविधांवर स्वतःच्या खिशातून खर्च करण्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून जनतेचे रक्षण करण्यावर आणि त्यांना गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची जोखीम कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य आणि कल्याण केंद्र आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना हे दोन स्तंभ असलेल्या आयुष्मान भारत कार्यक्रमाचे सार्वत्रिक आरोग्य छत्र पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.