पंतप्रधान फोन आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद; पंतप्रधान कार्यालयात काल देशभरातून हजारो फोन
स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या संकटात जनतेच्या प्रश्नांशी निगडीत सात महत्वपूर्ण मागण्यांसाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या वतीने सोमवारी पंतप्रधान कार्यालयात एक लाख फोन करण्याचे आंदोलन घोषित करण्यात आले होते. त्याला काल देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ईशान्यकडील राज्ये, राजस्थान दिल्ली, उत्तरप्रदेश आदी राज्यासह देशभरातील हजारो लोकांनी पंतप्रधान कार्यालयात फोन केले आहेत. किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी पंतप्रधानांना अत्यंत महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण 7 राष्ट्रीय मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
या मागण्यां मध्ये शेतकरी, कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या जनतेच्या खात्यावर थेट रुपये 15000 कोरोना मदत निधी म्हणून जमा करावेत. पंतप्रधान यांनी कार्यक्रम, भावनिक भाषणे व प्रसिद्धी इव्हेंट आता बंद करून फक्त औषध आणि लस याबाबतचे राष्ट्रीय नियोजन व कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावा. भारतीय सैन्याला सर्व धर्माच्या व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मानवंदना द्यावी. कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रूग्णांना नेमकी कोणती औषधे व कोणते उपचार दिले जातात हे जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे. यासह सात मागण्यांचा या आंदोलनामध्ये समावेश होता.
या आंदोलनामध्ये देशभरातून पंतप्रधान कार्यालयात सतत फोन येत असल्याने पंतप्रधान कार्यालयातील फोन सतत बिझी लागत होते. तसेच पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची जनतेच्या प्रश्नांना उत्तर देताना तारांबळ उडत होती. पंतप्रधान कार्यालयात असे आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जनतेतून हजारो फोन झाल्यानंतर आता जर पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय भाषणात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर वेगळ्या पद्धतीने राष्ट्रव्यापी आंदोलन करणार
– प्रफुल्ल कदम,
संस्थापक, किसान आर्मी व वॉटर आर्मी