स्थैर्य, नवी दिल्ली, दि१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका हा भाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्लांटचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल आणि एचपीसीएल, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी हे प्रकल्प उभारले आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही वर्षांपूर्वी बिहारसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये राज्याच्या पायाभूत सुविधांवर जास्त भर होता. ते म्हणाले की बिहारला देण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये पेट्रोलियम आणि वायूशी संबंधित 21 हजार कोटी रुपयांचे 10 मोठे प्रकल्प होते. यापैकी आज हा सातवा प्रकल्प बिहारच्या लोकांना समर्पित केला जात आहे. यापूर्वी बिहारमध्ये पूर्ण झालेल्या इतर सहा प्रकल्पांचीही यादी त्यांनी सादर केली. सुमारे दीड वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या महत्त्वपूर्ण गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या दुर्गापूर-बांका विभागाचे (सुमारे 200 किमी) उद्घाटन करत आहोत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आव्हानात्मक भूभाग असूनही अभियंता आणि कामगार यांचे परिश्रम व राज्य सरकारने वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी केलेल्या सक्रिय सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. एक पिढी काम सुरू करायची आणि दुसरी पिढी ते पूर्ण करायची या कार्य संस्कृतीतून बिहारला मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की ही नवीन कार्यसंस्कृती बळकट करण्याची गरज आहे आणि यामुळे बिहार आणि पूर्व भारत विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो.
पंतप्रधानांनी “सामर्थ्य मूलं स्वातंत्र्यम्, श्रम मूलं वैभवम् ।” हे शास्त्र वचन उद्धृत केले. याचा अर्थ शक्ती हा स्वातंत्र्याचा स्रोत आहे आणि श्रम शक्ती ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा आधार आहे. ते म्हणाले की, बिहारसह पूर्व भारतात श्रम शक्तीची कमतरता नाही आणि या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांची देखील कमतरता नाही आणि असे असूनही, बिहार आणि पूर्व भारत अनेक दशकांपर्यंत विकासाच्या बाबतीत मागे राहिला आणि राजकीय, आर्थिक कारणांमुळे आणि इतर प्राधान्यक्रमांमुळे कायम विलंब सहन करावा लागला. ते म्हणाले, रस्ते जोडणी, रेल्वे जोडणी, हवाई संपर्क, इंटरनेट जोडणी यांना यापूर्वी प्राधान्य नसल्यामुळे बिहारमध्ये गॅस आधारित उद्योग आणि पेट्रो-कनेक्टिव्हिटीची कल्पनाही केली गेली नाही. ते म्हणाले की गॅस आधारित उद्योगांचा विकास बिहारमध्ये एक मोठे आव्हान आहे कारण ते चहुबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे आणि त्यामुळे पेट्रोलियम आणि गॅसशी संबंधित संसाधनांचा अभाव आहे जी अन्यथा समुद्राला लागून असलेल्या राज्यात उपलब्ध आहेत.
पंतप्रधान म्हणाले, गॅस-आधारित उद्योग आणि पेट्रो-कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर, त्यांच्या जीवनमानावर होतो आणि कोट्यवधी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ते म्हणाले, आज सीएनजी आणि पीएनजी बिहार आणि पूर्व भारतातील अनेक शहरांमध्ये पोहोचत आहेत, येथील लोकांना सहज या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ते म्हणाले की, पूर्व भारताला पूर्वेकडील समुद्राच्या किनारपट्टीवर पारादीपशी आणि पश्चिम समुद्रावरील कांडलाशी जोडण्याचा भगीरथ प्रयत्न पंतप्रधान उर्जा गंगा योजनेंतर्गत सुरू झाला आणि सुमारे 3000 किमी लांबीच्या या पाइपलाइनद्वारे सात राज्ये जोडली जातील, त्यापैकी बिहार देखील यात एक प्रमुख भूमिका पार पाडेल. पारादीप – हल्दिया मार्ग आता पुढे पाटणा, मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात येईल आणि कांडलाहून येणारी पाइपलाइन जी गोरखपूरला पोहोचली, ती देखील त्याला जोडली जाईल. ते म्हणाले की जेव्हा हा संपूर्ण प्रकल्प तयार होईल, तेव्हा तो जगातील सर्वात लांब पाइपलाइन प्रकल्पांपैकी एक असेल.
पंतप्रधान म्हणाले की आज बिहारमध्ये शिक्षणाची मोठी केंद्रे सुरू होत आहेत. आता कृषी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. आता बिहारमधील आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी बिहारमधील तरुणांची स्वप्ने उंचावण्यासाठी मदत करत आहेत. बिहारमधील पॉलिटेक्निक संस्थाची संख्या तीनपट वाढविण्यात आणि बिहारमध्ये दोन मुख्य विद्यापीठे, एक आयआयटी, एक आयआयएम, एक एनआयएफटी आणि एक राष्ट्रीय विधि संस्था सुरू करण्यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान म्हणाले, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना आणि अशा अनेक योजनांमुळे बिहारमधील तरुणांना आवश्यक प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. ते म्हणाले की, आज बिहारमधील शहरे व खेड्यांमध्ये विजेची उपलब्धता पूर्वीपेक्षा जास्त आहे. उर्जा, पेट्रोलियम आणि गॅस क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्या सुधारणांच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुकर बनवत आहे तसेच उद्योगांना आणि अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या या काळात पुन्हा पेट्रोलियमशी संबंधित पायाभूत सुविधा , उदा. रिफायनरी प्रकल्प, शोध किंवा उत्पादनाशी संबंधित प्रकल्प, पाइपलाइन, शहर गॅस वितरण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. ते म्हणाले की, 8 हजाराहून अधिक प्रकल्प आहेत, यावर आगामी काळात 6 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.
पंतप्रधान म्हणाले, स्थलांतरित कामगार परत आले आहेत आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या जागतिक महामारीच्या काळातही देश थांबलेला नाही विशेषतः बिहार थांबलेला नाही. 100 लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीचा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन प्रकल्प आर्थिक घडामोडी वाढवण्यात मदत करेल असे ते म्हणाले. बिहार, पूर्व भारत विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवण्यासाठी प्रत्येकाने वेगाने काम करत रहावे, असे आवाहन त्यांनी केले.