दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सांगली । जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण, वय वर्षे २२ यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शिगाव येथे शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शिगाव येथील स्मशानभूमीत शहीद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, तहसिलदार प्रदीप उबाळे, अप्पर तहसिलदार श्रीमती धनश्री भांबुरे, जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, वैभव शिंदे, सरपंच उत्तम गावडे, बाजीराव देशमुख, सांगली व कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्या मनिषा गावडे, सांगली जिल्हा सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता वैशाली चव्हाण यांनी तर सैन्य दलाच्या वतीने सुभेदार विजय कांबळे, स्टेशन कमांडर कोल्हापूर यांच्या वतीने, जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण कमांड यांच्या वतीने सुभेदार राजाराम पाटील यांनी शहीद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव सकाळी 6.50 च्या सुमारास शिगाव गावात दाखल झाले. पार्थिव गावात येताच अमर रहे अमर रहे, रोमित चव्हाण अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा रोमित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा गावकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली. पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. घराजवळ आणि गावाच्या कमानीजवळ लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजवलेल्या रस्त्यावरून शहीद रोमित चव्हाण यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मध्यवर्ती हुतात्मा राजेंद्र पाटील चौकात सकाळी 7.45 च्या दरम्यान त्यांचे पार्थिव गावकऱ्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावकरी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी जनसमुदायांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. सकाळी 8.50 वाजता पार्थिव वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर वडील तानाजी चव्हाण यांनी मुखाग्नी दिला. शहीद रोमित चव्हाण अनंतात विलीन झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी वीरपिता तानाजी चव्हाण यांच्याकडे राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. शहीद रोमित चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे वडील तानाजी चव्हाण, आई वैशाली चव्हाण, बहिण तेजस्विनी असे कुटुंबीय आहेत.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, वारणा काठची परंपरा शूरत्वाची, वीरत्वाची आहे. याच परंपरेशी नाते सांगणारा शहीद रोमित चव्हाण लहानपणापासूनच सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वप्न बाळगून होता. बारावी झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले व तो सैन्यामध्ये भरती झाला. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या शोघ मोहिमेतील पथकामध्ये काम करत असताना शोध मोहिमेदरम्यान एका घरामध्ये लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या एका साथीदारावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यामध्ये त्यांना वीरमरण आले. अशा या धाडसी रोमित चव्हाण यांचा अभिमान वारणा काठच्या लोकांबरोबरच सर्व देशाला कायम राहील. शहीद रोमित यांच्या कुटुंबियांना हा बसलेला धक्का न पेलवणारा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या या शोककाळात आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात पालकमंत्री जयंत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून धीर दिला.