भारतीय उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी; मालदीवच्या शिष्टमंडळाचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मालदीवमध्ये पर्यटनाबरोबरच विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी असून भारतातील उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्या नेतृत्वाखाली भारत भेटीवर आलेल्या शिष्टमंडळाने केले.

मालदीवच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळाने आज मुंबईत सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) च्या सहकार्याने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित औद्योगिक परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी मालदीवचे वित्तमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फैय्याज इस्माईल, भारताचे उच्चायुक्त मुनू महावार, सीआयआयच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा आदींसह उद्योजक उपस्थित होते.

कोविडच्या महामारी नंतर मालदीवची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली असून या काळात भारताचे चांगले सहकार्य लाभल्याचे इब्राहिम अमीर यांनी यावेळी सांगितले. या वर्षी मालदीवच्या पर्यटन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये भारतीय पर्यटकांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. मालदीवमध्ये पायाभूत सुविधा, पर्यावरण, नवीकरणीय ऊर्जा, मत्स्यव्यवसाय आणि शेती, आरोग्य, किनारा संवर्धन, दळणवळण, शिक्षण आणि कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम व्यवसाय अशा विविध क्षेत्रातही गुंतवणुकीच्या संधी असून भारतातील उद्योजकांनी मालदीवमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय उद्योजकांचे स्वागत असून मालदीव आणि भारतामधील व्यावसायिक संबंध भविष्यात अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मालदीवमधील भारताचे उच्चायुक्त मुनू महावार यांनी दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!