
दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । बाली – इंडोनेशियातील जी-२० गटाची बाली येथील शिखर परिषद संपली आहे. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्याने इंडोनेशियाकडून बुधवारी आगामी वर्षासाठी जी-२०चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या जी-२० परिषदेचं अध्यक्षपद सोपवलं आहे.
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको यांच्याकडे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या गटाचे अध्यक्षपद स्वीकारणे ही भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व देशांच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही जी-20 शिखर परिषद जागतिक कल्याणासाठी आदर्शवत बनवू असंही मोदी म्हणाले.
दोन दिवसीय शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपद सुपूर्द करण्याचा सोपस्कार आज पार पडला. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, जी -२० ‘परिषदेचे दस्तवेज तयार करण्यात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तत्पूर्वी आपल्या वेळापत्रकात शेवटच्या क्षणी झालेल्या बदलामुळे इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आयोजित केलेल्या गाला डिनरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हजर राहु शकले नाही.
जी-२० मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन (ईयू) या १९ देशांचा समावेश आहे. या सर्व देशांचा जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात्या ८० टक्क्यांहून अधिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात ७५ टक्के वाटा आहे. तसेच या देशांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे.