राष्ट्रपतींनी दिली लष्कराच्या हॉस्पिटलला 20 लाखाची देणगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 26 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्कराच्या हॉस्पिटलला 20 लाख रुपये देणगी दिली आहे. या पैशाचा उपयोग कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि औषध खरेदी करण्यासाठी केला जाईल. याचा उपयोग पॉवर एअर प्युरिफिंग रेस्पिएटर (पीएपीआर) खरेदी करण्यासाठी देखील केला जाईल. पीएपीआर डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना वापरतात. हे श्‍वासोच्छवासास मदत करते आणि संक्रमण होण्यापासून प्रतिबंधित करते. हे उपकरण कोरोनावर उपचार घेणार्‍या नागरिकांना देखील मदत करेल.

या संदर्भात राष्ट्रपती भवनद्वारे निवेदन जारी करण्यात आले आहे. ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज कारगिलमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहत दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलला 20 लाखांचा धनादेश दिला. या निधीचा उपयोग कोरोना साथीविरोधात दृढपणे लढण्यासाठी केला जाईल’, असे निवेदनात म्हटले आहे. देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारताच्या पाकिस्तानवरील विजयाला 21 वर्षे झाली आहेत. हा निधी राष्ट्रपती भवनाच्या मालमत्तेतून उभा करण्यात आला आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना संकटामुळे राष्ट्रपतींनी आधीच खर्च कमी करण्याचे निर्देश दिले होते. समारंभासाठी वापरली जाणारी लिमोझिन कार खरेदी करण्यासही राष्ट्रपतींनी नकार दिला आहे. राष्ट्रपतींच्या या निर्णयामुळे लष्कराला प्रोत्साहन मिळेल. नागरिकही देखील यातून प्रेरणा घेतील आणि अशा प्रकारे ते देशासाठी आणि कोरोनाविरोधी लढाईसाठी  बचत करतील आणि तो निधी वापरतील, असे राष्ट्रपती भवनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दिल्लीतील लष्कराचे हॉस्पिटल हे जवानांसाठीचे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. कारगिल विजयची घोषणा भारतीय सैन्याने 26 जुलै 1999 रोजी केली होती. कारगिलमधील शिखरांवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात तीन महिने लढाई सुरू होती. यात देशातील 500 हून अधिक जवान शहीद झाले होते. यावेळी डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसुद्धा रात्रंदिवस काम करत होते आणि जवानांवर उपचार करत होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!