मायणी परिसरात नावीन्यपूर्ण फुलपाखरांची हजेरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मायणी, दि. ०५ :  सभोवतालच्या कोरोना वातावरणात मायणी नगरीत ‘वन्यजीव सप्ताहात’ एक सुखद आनंद देणारी बाब आढळून आली. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ याने मायणी येथे आपली उपस्थिती दाखवली आहे. कॉमन बॅरन फुलपाखरासह निरनिराळ्या फुलपाखरांची उपस्थिती मायणीच्या शिरपेचात निसर्गाचा अनोखा तुरा खोवत आहेत.

मायणीत गेले दोन दिवस ‘नीलवंत’ (ब्ल्यू मॉर्मन) फुलपाखरू सूरज किशोर बाबर यांच्या स्टील दुकानात ठाण मांडून बसले होते. बाबर यांनी त्याला हटकले नाही; परंतु त्यांनी सोशल मीडियावरील आलेली फुलपाखराची माहिती पाहून दुकानातील फुलपाखरू निरखून पाहिले असता ते ‘नीलवंत’ असल्याचे समजले.  चांदणी चौक येथे शादाब राजू बागवान या युवक फळविक्रेत्याच्या दुकानातील डाळिंबावर कॉमन बॅरन हे फुलपाखरू आपल्या सोंडेने रस ग्रहणाचे काम करताना आढळले. या नवनवीन फुलपाखरांचे वावरणे लोकांतील उत्सुकता वाढवत आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मायणी ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान या ठिकाणी पक्ष्यांचे आकर्षण वाढले आहे. याबरोबरच नवनवीन प्रसिद्ध फुलपाखरांची परिसरातील उपस्थिती पर्यटकांना आकर्षित करत आहे.

 

ब्ल्यू मॉर्मन :(नीलवंत) या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत व श्रीलंकेत आढळते. पश्‍चिम घाटातील वनात त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. मुंबई, नागपूर व औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही ते आढळते. त्याचा पंखविस्तार 150 मि.मी. असतो. शरीर व पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीराकडील टोकावर लाल ठिपका (बुंदका) असतो. काळ्या पंखावरची निळी तकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करत असते. फुलातील मकरंद व चिखलातील क्षार शोषून घेते. संत्री, इडलिंबू व मोसंबी या वनस्पतींवर मादी अंडी घालते. 22 जून 2015 मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे.

कॉमन बॅरन (पंख विस्तार -55 ते 80 मिमी.) (र्एीींहरश्रळर रलेपींहशर उीराशी) नर कॉमन बॅरन गडद तपकिरी रंगाचा असून याच्या पुढील पंखावर बारीक ठिपक्यांची ओळ असते. मादी मात्र फिक्कट तपकिरी असून तिच्या पुढील पंखावर ठळक पांढरा पट्टा असतो. दोघांच्या मागील पंखावर काळे ठिपके असतात. याचे शरीर मजबूत असते. हे वेगाने व जोमाने उडते. हे नेहमी पंख उघडे ठेवून बसते. माळराने वगळता हे सर्व प्रकारच्या अधिवासात व शहरी भागात आढळते. याला कुजकी फळे, पक्षी विष्ठा व ओलसर जागा विशेष प्रिय आहेत. हे फुलांवर कधीही येत नाही. कॉमन बॅरन संपूर्ण भारतात आढळते.

 

हा काळ फुलपाखरांसाठी पोषक असतो. या काळात अनेक फुलपाखरांच्या जाती कोषातून बाहेर पडून आकाशी झेप घेत असतात. सध्या अनेक पक्षी प्राणी संघटना या नवीन प्रजातींचा शोध घेत असतात. यावर संशोधन करत असतात. यासाठी स्थानिक पातळीवर या जीवांचे संगोपन होणे गरजेचे असून या जीवांची त्या-त्या भागातील उपस्थितीची नोंद होणे गरजेचे आहे…सर्वदमन कुलकर्णी, अ‍ॅनिमल सहारा फाउंडेशन, सांगली.

अतिशय आकर्षक व अनोखे दिसणारे हे निलवंत फुलपाखरू दुकानात दोन दिवस येऊन बसले होते. आम्हीही त्याला हटकले नाही. परंतु मोबाईलवर आलेल्या माहितीने आम्हाला हे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन असल्याचे समजले. आम्हाला आनंद झाला. पक्षी आश्रयस्थाना सोबत परिसरातील फुलपाखरू व इतर नवीन जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत..-किशोर बाबर



 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!