स्थैर्य, सातारा, दि.२४: समर्थ समाजी प्रगटवे शक्तीगंगा..शिवराय साधे सोबती भक्तीगंगा..समन्वयाची ऐसी परंपरा सांगा…अन्य कोणी साधियेली…अशी भक्तीशक्ती संमगाचे महत्व असलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ज्या ठिकाणी झाली ते शिंगणवाडी गाव. येथे गेल्या सात वर्षापासून शिवसमर्थ प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी तीच प्रथा कोरोनामुळे खंडीत पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शिवभक्तांनी कोरोनाचे नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात शिवसमर्थ प्रेरणा दिनाची परंपरा अखंडीत ठेवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती चाफळ येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातून सोमवारी सकाळी शिवभक्तांनी घेवून शिगंणवाडीच्या दिशेने प्रस्तान केले. अद्वैत प्रभावळकर, विक्रांत जोशी, तोडकर यांच्यासह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जय घोष करत शिंगणवाडीला पोहचले. पायीच शिवभक्तांनी शिवमूर्ती नेण्यात आली. तर शिंगणवाडीमधील ग्रामस्थांनी समर्थ रामदास स्वामी यांची मूर्ती शिंगणवाडीच्या वेशिपर्यंत आणली. दोन्ही मूर्तीची भेट होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करण्यात आली. तेथील तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शिवसमर्थ स्मारकाला प्रदक्षिणा घालून पुढे या दोन्ही मूर्ती शिवभक्तांनी आणि ग्रामस्थांनी हनुमान मंदिरापर्यंत नेल्या. गेल्या सात वर्षापासून शिंगणवाडी (ता. पाटण) येथे शिवसमर्थ प्रेरणा दिन साजरा केला जातो. वैशाख शुद्ध नवमीला समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी लॉकडाऊन असल्याने त्याची परंपरा खंडीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारची परवानगी मागून सर्व कोरोना निर्बध पाळून हा दिवस साजरा करण्यात आला.