स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि. २७ : मानवी जीवाला संसार कधी चुकला नाही . परंतु संसारात राहून अध्यात्म करता येते . भक्तीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचे असेल तर त्यासाठी ज्ञानेश्वरीचे नित्य निरुपण आवश्यक आहे . मानवाला संसारात राहून भक्तीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचविण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानेश्वरीतच आहे असे मत ह भ प प्रमोद महाराज राहणे यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( शनिवारी ) पंधराव्या दिवशी श्री क्षेत्र अटाळी ता खामगाव जि बुलढाणा येथील ह भ प प्रमोद महाराज राहाणे यांनी पुरुषोत्तमयोग या पंढराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले.
आंता हृदय हें आपुलें lचौफाळुनियां भलें l
वरी बैसऊ पाउले l श्रीगुरुची ll
ह भ प राहाणे महाराज म्हणाले, पंधराव्या अध्यायात माउलींनी संसाराला एका अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. संसारात राहूनही परमार्थ करता येतो. क्षराक्षरांतीत उत्तम पुरुषाच्या यथार्थ ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते.
कबीर महाराज म्हणतात ,
पशु की होत पन्हैय्या नर का कछु न होय !
नर करणी करे सो नर का नारायण होय !!
तस मनुष्याला पुरुषार्थ साधून पुरुषोत्तम होता येत .
सुर्योदय झाल्यानंतर जसा अंधार आपोआप पळून जातो
तस माणसाला पथदर्शक म्हणुन भावार्थदीपीका जीवनात कामी येते . माऊली बोलतात…
सुर्ये अधीष्ठीली प्राची !
जगा राणीव दे प्रकाशाची !
तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची !
दिवाळी करी !!
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात , पार्था हे अत्यंत गुढ ज्ञान , विज्ञान प्राप्त करुन देणारे शास्त्र मी तुला सांगितले आहे . याचे ज्ञान करुन घेतल्यास माणूस बुध्दीमान आणि कृतकृत्य होतो .
या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .
आज रविवार दि . २८ रोजी येथील ह भ प प्रशांत महाराज ताकोते हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या दैवासुरसंपद्विभागयोग या सोळाव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान मंगळवारी पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा, अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. सायंकाळी ५ वाजता शेडगे दिंडीच्या वतीने ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरु यांनी भारुडाची सेवा केली. रात्री ठाकुरबुवांच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री घोरपडे, सातारकर यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली.