
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । ग्रामीण भागातील जनतेला एकत्रित घेवून शाश्वत उपजीविकेचा मार्ग दाखवून त्यांना गरिबीच्या जोखडातून बाहेर काढणे हे आपल्या उमेद अभियानाचे उद्दिष्ट आहे. खरे तर हा पल्ला गाठण्यासाठी योग्य नियोजनासोबतच केलेले नियोजन प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी कुशल व त्याच तळमळीने काम करणाऱ्या मनुष्यबळाची सुद्धा आवश्यकता आहे. उमेद अभियानाने हीच गरज ओळखून विविध स्तरांवर ग्रामीण भागात तळागाळात जावून काम करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींची नेमणूक केलेली आहे. यापैकी गावपातळीवर काम करणाऱ्या आपल्या अभियानातील प्रेरिका या खूप महत्वाची आणि जबाबदारीची कामगिरी पार पाडत असतात. अशाच एक प्रेरिका सौ. वैशाली जालिंदर पवार यांच्या कार्याची यशोगाथा.
सातारा तालुक्यातील अंबवडे खुर्द गाव हे साधारणत: २७८ उंबरठ्याचे गाव आहे. या भागातील लोकांसाठी उमेद अभियान नवीन असले तरी अभियानातील बऱ्याच संकल्पना या लोकांना माहिती आहेत. उमेद अभियानातील दशसुत्रीनुसार गावामध्ये साऱ्या समूहांचे कामकाज चालू आहे. या गावच्या प्रेरिका सौ. वैशाली जालिंदर पवार या त्यांचे काम खूप प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडत आहेत. गावातील महिलांना उमेदची संकल्पना, दशसुत्री, तसेच उमेद अभियानातून होणारे फायदे त्यांनी पटवून सांगितले होते. विशेषतः दशसुत्रीनुसार कामकाज करण्याबाबत त्या आग्रही असतात.
सौ. वैशाली पवार यांचे शिक्षण १२ वी MLT झालेले आहे. त्यांचे पती हे सातारा येथील मुकबधीर शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत, पगार तसा तुटपुंजा. वैशाली यांना दोन लहान मुले आहेत. त्यामुळे संसाराची बाजू समर्थपणे पेलत असताना गावामध्ये उमेद अभियानाला घराघरांत पोहचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पायाला जणू भिंगरीच बांधलेली आहे. अंबवडे खुर्द मध्ये सध्याला १७ समूह कार्यरत आहेत. या सर्व समूहांचे व्यवहार उमेदच्या दशसुत्रीप्रमाणे चालू आहेत. या समूहांना आज अखेर ३५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिलेले आहेत.
गावातील समूहांच्या आठवडी बैठकींमध्ये प्रेरिका जातीने उपस्थित असतात, मग ती बैठक रात्री ११ वाजता का असेना, त्यांचे पती याबाबतीत त्यांना खंबीरपणे साथ देतात.
गावामध्ये होणाऱ्या ग्रामसभेत उमेद अभियानातील जवळ जवळ ६०% महिला उपस्थित असतात, आणि स्वत:चे सक्रीय योगदान देत आहेत. गावातील प्रत्येक घराघरांत कौशल्य विकासाच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेची माहिती आहे. उमेद अभियानामार्फत एकत्र आलेल्या महिलांना विमा संरक्षण घेण्यासाठी उद्युक्त केलेले आहे. आज गावामधील प्रत्येक महिलेच्या मनात स्वत:चा आर्थिक विकास आणि गावाचा विकास करण्याची उस्फुर्त भावना आहे.
गावातील स्वयंसहाय्यता समूहांतर्फे गावामध्ये स्वच्छता मोहीम, महिलांसाठी आरोग्य शिबीर अशाप्रकारची विधायक कामे केली जात आहेत. अंबवडेच्या वैशाली पवार या फक्त त्यांच्याच गावात काम करतात असे नाही तर प्रभागातील इतर गावात सुद्धा मदत करतात. आता त्यांचे पुढचे लक्ष म्हणजे गावातील समूहातील महिलांना उद्योग मिळवून देणे हे आहे. त्यांची एक धारणा आहे ती म्हणजे ‘देव तर प्रत्येकाच्या पाठीशी असतोच पण जर या समाजसेवेरुपी कामाला देव मानून पूजा केली तर देव पाठीशी नाही तर तुमच्या पुढे राहून तुमच्या मार्गातील सर्व संकटे दूर करतो’ खरंच अशा कामामध्ये देव पाहणाऱ्या प्रेरीकांमुळे आज उमेद अभियानाची व्याप्ती वाढलेली आहे आणि याचा फायदा गावातील गरजू लोकांना होत आहे. प्रेरिका या अभियानासाठी एक शक्तीच आहेत.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा