महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 23 मार्च 2025। सातारा । आपल्या अतुलनीय पराक्रमाने मोघलांना नामोहरम करून छत्रपती शिवरायांचे स्वराज्य जिवंत ठेवणार्‍या मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांची संगममाहुली येथील समाधी अत्यंत दुरवस्थेत आहे. स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या समाधिस्थळाजवळील एका मंदिराजवळ ताराराणी यांच्या समाधीची दगडी रचना उघड्यावरच ठेवण्यात आली आहे. तेथे महाराणी ताराबाई असा दर्शवणारा नामफलकसुद्धा या समाधीची शोकांतिका सांगत आहे. इतिहासामध्ये प्रेरणा देणार्‍या या व्यक्तिमत्वांची समाधिस्थळे संरक्षित करून, त्यांची भव्य स्मारके उभारली जावीत, यासाठी राज्य शासनाने जीर्णोद्धाराचा आराखडा बनवावा, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ख्याती असलेल्या संगम माहुली येथे राजघाट परिसरात छत्रपती शिवरायांच्या वंशातील अनेक महनीय व्यक्तिमत्त्वांच्या समाध्या आहेत. त्यामध्ये मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या समाधीची दुरवस्था सध्या चर्चेचा विषय आहे. महाराणी ताराबाई यांनी त्यांचे पती आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याची कमान हाती घेत, अत्यंत पराक्रमाने सम्राट औरंगजेबाला यशस्वी टक्कर दिली होती. 1707मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर ताराराणी यांचे सातार्‍याचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याशी राजकीय वाद झाले. त्यातून कोल्हापूरच्या स्वतंत्र गादीची निर्मिती झाली. मात्र, सर्व राजकीय वाद आणि कलह मिटल्यानंतर 1730 मध्ये महाराणी ताराबाई या सातार्‍यामध्ये राहायला आल्या आणि 1761 मध्ये त्यांचे सातार्‍यात वयाच्या 86 व्या वर्षी देहावसान झाले. त्यावेळी त्यांची समाधी येथील संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या काठावर बांधण्यात आली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या समाधी संदर्भात नुकतीच प्रतिक्रिया देताना, या भागाचा जीणोंद्धार करण्याची तसेच माहुलीच्या ऐतिहासिक घाटांची पुनर्बाधणी आणि पर्यटनाला उत्तेजन देण्याचे सुतोवाच केले आहे. ही आनंदाची बाब आहे. जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवून, संगम माहुली येथील पर्यटन आणि मंदिरांचे धार्मिक महात्म्य कसे जपता येईल, यासाठी एक विशेष आराखडा बनवून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सद्य स्थितीमध्ये कृष्णा नदीपात्रात असलेली ताराबाईंची समाधी ही विस्मरणाच्या गर्तेत गेली होती. काही वर्षापूर्वी एका खाजगी प्रतिष्ठानने ही समाधी शोधून, तिच्या बाजूने दगडी चौथरा बनवला होता. मात्र, शोध मोहिमेनंतर या समाधीची दगडी रचना आणि तेथील फलक महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या समोर एका तुळशी वृंदावनाजवळ ठेवण्यात आले आहेत. या समाधीच्या दगडी चिरासुद्धा उघड्यावरच पडल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस यामुळे समाधीच्या चिरांची झीज होत आहे. महाराणी ताराराणी यांच्या समाधिचा जीर्णोद्धार करून, झळाळी द्यावी, अशी बर्‍याच वर्षांपासूनची मागणी आहे. यामध्ये राज्य शासनाने लक्ष घालावे आणि त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.


Back to top button
Don`t copy text!