दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सातार्यातील एका हॉटेल व हातगाडी व्यावसायिकाला गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसात देवूनही कारवाई होत नसल्याने सातार्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर एका व्यावसायिक दाम्पत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी, संबंधित व्यावसायिक दाम्पत्याचा हॉटेल व हातगाडीचा व्यवसाय आहे. या दाम्पत्याला साहिल कोलकर, त्याचा भाऊ सलीम कोलकर व आई क्षमाप्पा कोलकर यांनी हॉटेल व हातगाडीवर गुटखा विक्रीसाठी ठेव, जास्तीचे पैसे देतो, असे म्हटले होते. परंतु, त्याला दाम्पत्याने नकार दिल्याने गुटखा व्यावसायिकाने तिथेच त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व सातारामध्ये राहायचे असेल तर दोन लाख खंडणी दे, तसे न केल्यास घरातील प्रत्येक व्यक्तीला संपवून टाकेन, कराड व सांगली भागातून गुंड सांगून जीवे मारून टाकण्याची धमकी दाम्पत्याला दिली होती.
या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी डागा पोलिस ठाण्यात गेले असता खंडणीचा गुन्हा दाखल न करता कलम ५०६, ५०४, ३२३ या कलमाने एन.सी.आर. दाखल केली. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर दि. २० आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. तरीही कारवाई न झाल्याने दाम्पत्याने शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखले व ताब्यात घेतले.