
स्थैर्य, फलटण, दि. २२ : लोणंद औद्योगिक वसाहतीमध्ये सुरु झालेल्या सोना अलाईज कंपनीमुळे लोणंद व परिसराच्या औद्योगिक व आर्थिक विकासात भर पडली, त्याचबरोबर सुमारे १ हजारावर तरुणांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र सदर कंपनी बंद पडल्यामुळे गेल्या एक दीड वर्षापासून हे सारे ठप्प झाल्याबद्दल चिंता व्यक्त करीत सदर कंपनी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुरु होण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.
सोना अलाईज कंपनीमधील कामगारापैकी व्यंकटेश सातारा जिल्हा जनरल कामगार युनियन या मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे ३८३ कामगार सभासद असून कंपनी बंद पडल्यापासून या कामगारांनी अन्य कामकाजाद्वारे चरितार्थ चालविला परंतू करोना लॉक डाऊन मुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी युनियनचे अध्यक्ष व महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, युनियनचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अत्यंत गरजू कामगारांना प्राधान्याने १० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी ४८ कामगारांना सदर रक्कम देण्यात येत असल्याचे युनियनचे सह सेक्रेटरी प्रा. भीमदेव बुरुंगले यांनी ससंगीतले. त्याचे औपचारिक वितरण श्रीमंत संजीवराजे यांचे हस्ते करण्यात आले.
फलटण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास श्रीमंत संजीवराजे, उपाध्यक्ष बाळासाहेब शेळके, संभाजी घाडगे, खजिनदार संजय फडतरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, सभासद, कामगार व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.