
दैनिक स्थैर्य । दि. 19 जुन 2025 । फलटण । ‘‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी मार्ग आत्ताच्या घडीला पुर्णावस्थेत हवा होता. मात्र तसे न घडता या मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असून यामुळे शहरवासियांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. विद्यमान सत्ताधार्यांचे हे भले मोठे अपयश आहे’’; अशी टिका राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, ‘‘विद्यमान सत्ताधार्यांनी शहरातील पालखी मार्ग सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर फलटणकरांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले होते. सुमारे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस या कामाला सुरुवात झाली. मात्र 5 महिने उलटून आता पालखीचे आगमन फक्त 10 दिवसांवर आले असतानाही ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे फलटणकरांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.’’
‘‘संबंधित कामाच्या कंत्राटदाराने आधी मलठणमधले रस्ते खोदले, त्यानंतर विमानतळा नजिकचा रस्ता खोदला. खोदकाम केलेल्या ठिकाणचे संपूर्ण काम करायचे सोडून पुन्हा गिरवी नाका, कामगार वसाहत, महात्मा फुले चौक या ठिकाणचे रस्ते खोदण्यात आले. कामातील चूकीचे नियोजन आणि सत्ताधार्यांचे दुर्लक्ष यामुळे खोदलेला कोणताही रस्ता अद्याप पुर्ण झालेला नाही. पालखीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अन्य ठिकाणचेही पॅचवर्क होणे अपेक्षित होते; तेही अद्याप झालेले नाही. यातून सत्ताधारी व प्रशासन यांची उदासिनता दिसून येत असून वारकर्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’’, असे नमूद करुन ‘‘यापूर्वी असे ढिसाळ नियोजन फलटणकरांना पहायला मिळाले नव्हते’’, असा खोचक टोलाही प्रितसिंह खानविलकर यांनी सत्ताधार्यांना उद्देशून लगावला आहे.