
दैनिक स्थैर्य । 27 जून 2025 । फलटण । शोषित, पिढित, वंचित समूहाबरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या न्याय हक्कांसाठी अनेक प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून त्यांचे हक्क जपण्याचे काम केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली. त्यांनी कधीही राजेशाही मिरवलीनाही. म्हणूनच त्यांना रयतेचा लोकराजा म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप म्हणाले, रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकराजा, राजर्षी या उपाधींनी ओळखतो. खर्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांचे विचार व कार्य बहुजन समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचार व कार्याचा जागर करून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करूया.
सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान होते. राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आहे. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, कृषी, शिक्षण या बाबत आदर्शवत आहे. त्यांनी या सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूरचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सक्तीचा शिक्षणाचा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात करून 50 टक्के आरक्षण देशात देऊन सर्वप्रथम आरक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. म्हणूनच आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो. त्यांनी जातीप्रथेचे समूळ उच्चाटन केले. राधानगरी सारखे धरण निर्माण करून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना ’सामाजिक समतेचे आधारस्तंभ’ म्हणून संबोधतात. त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाऊन समताधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करूया.
शाखेचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.

