दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन पाटील यांना विजयी करून फलटणच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह यांच्या केलेल्या पराभवाचा बदला घेतला आहे, असे प्रतिपादन माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
फलटण विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील यांच्या विजयानंतर काढलेल्या भव्य रॅलीत जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विजयी उमेदवार सचिन पाटील होते.
जयकुमार गोरे म्हणाले की, आज मी फलटण आलोय ते माझा भाऊ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन करण्यासाठी. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह यांचा ज्यांनी पराभव केला, त्यांचा आज फलटणच्या जनतेने ‘खेळ खल्लास’ केला आहे. फलटणच्या जनतेने आज गेल्या २५-३० वर्षांचे दहशतवादाचे साम्राज्य उखडून टाकले आहे. सचिन पाटील यांचा विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे. हा विजय लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीला तिलांजली वाहणार्या फलटणच्या नेतृत्वाला आज जनतेने दाखवून दिले आहे की, फलटणचे बॉस ‘रणजितदादा’च आहेत. लोकसभेला फलटणच्या मातीचा ज्यांनी अपमान केला, त्यांनी आम्ही आज घरी बसविले आहे. ज्यांनी फलटणच्या खासदारांचा पराभव केला, त्यांचा आज जनतेने बदला घेतला आहे. फलटणच्या जनतेने माजी खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी राहावे, फलटणला काही कमी पडणार नाही.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटणच्या लाडक्या बहिणींनी आज सचिन पाटील यांना विजयी करून आमदार केले आहे. फलटणच्या जनतेने आज सर्वसामान्यांच्या हातात सत्ता दिली आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांनी फलटणच्या पाण्यासाठी, रेल्वेसाठी, एमआयडीसीसाठी, रस्त्यांसाठी भरभरून असा निधी दिला आहे. अजित पवार यांचे अभिनंदन करतो, त्यांना आज आम्ही फलटणचा आमदार दिलेला आहे. अजितदादांना आजपर्यंत फलटणमध्ये विश्वासघातकी माणसे भेटली होती. खासदार नितीन पाटील यांनीही सचिन पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत. जयकुमार गोरे यांनी फलटणच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. दीपक चव्हाण आज माजी आमदार झालेले आहेत. रामराजे, पिंटूबाबा व त्यांच्या कुटुंबियांनी प्रचंड दहशत प्रशासनावर लावली होती. दीपक चव्हाण हे निष्क्रिय आमदार होते. सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी सचिन पाटील यांना आज जनतेने आमदार केले आहे. फलटणच्या जनतेने आज दाखवून दिले आहे की, चुकीचे वागले तर फलटणच्या जनता माफ करत नाही. आज फलटणची मुजरेशाही, जहागिरी गेलेली आहे. सचिन पाटील यांना फलटणच्या जनतेने पाणीप्रश्न, बेरोजगारी आदी प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. आज जनतेने सचिन पाटील यांना निवडून दिलेले नाही, तर रणजितसिंह निंबाळकरांना निवडून दिलेले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व माजी आमदार दीपक चव्हाण यांना सांगतो की, मी जसा लोकसभेचा पराभव पचवला तसा त्यांनी विधानसभेचा पराभव पचवावा. माझ्या कार्यकर्त्याला त्रास दिला तर मी गप्प बसणार नाही.
विजयी उमेदवार सचिन पाटील म्हणाले की, फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी फलटण तालुक्यातील शेतकरी, व्यापारी वर्ग व जनता लढली. फलटणची जनता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ताकदीच्या जोरावर हा विजय खेचून आणला आहे. फलटणच्या जनतेने मला आमदार केले आहे. या जनतेला दिलेला शब्द न शब्द मी खरा करून दाखवणार आहे. पुढील पाच वर्षात माजी खासदार रणजितसिंह यांनी दिलेला पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द तो पूर्ण करणार आहे. नीरा-देवघरचे पाणी बारमाही होणार आहे. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते पूर्ण करणार आहे. तालुक्यातील जनतेला ज्या काही अडचणी येतील, त्या आम्ही सोडवणार आहे. माझ्या विजयासाठी जयकुमार गोरे यांनीही ताकद लावली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
या रॅलीत समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळस्कर, डी. के. पवार, जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.