दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । शिवसेनेतील नाराजांना गळास लावून महाविकास आघाडीला भगदाड पाडत राज्याची सत्ता काबीज करण्यात भारतीय जनता पार्टीला नुकतेच यश मिळाले आहे. फलटण पालिकेवर अखंड सत्ता गाजवणार्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटात आज मितीस प्रत्येक प्रभागात इच्छुकांची मोठी गर्दी दिसत असून उमेदवारीवरुन नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा फायदा घेवून राजेगटातील नाराजांना सोबत घेवून राज्यात राबवलेला सत्तांतराचा पॅटर्न फलटण पालिकेत राबवण्यात भाजपला यश मिळेल कां? असा सवाल राजकीय वर्तृळात चर्चेला येताना दिसत आहे.
फलटण नगरपालिकेच्या निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. फलटण शहर व तालुक्यातील राजकीय बलाबल पाहता ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गट विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्ष प्रणित खासदार गट अशा प्रमुख लढती शहरातील प्रत्येक प्रभागात रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. या निवडणूकीत सलग 30 वर्षांची सत्ता अबाधित राखण्याचे आव्हान राजेगटा समोर असून कोणत्याही परिस्थितीत पालिकेत सत्तांतर घडवून आणण्याचे आव्हान खासदार गटासमोर असणार आहे.
एकीकडे ना.श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्त्वाखाली फलटण पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात आम्ही यशस्वी झालो असून इथून पुढेही कार्यरत राहण्यासाठी जनता आमच्याच पाठीशी उभी राहील असा दावा राजे गटाचे कार्यकर्ते करताना दिसत असून दुसरीकडे राज्यामध्ये अनपेक्षित सत्तांतर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने फलटण पालिकेतही आम्ही खा.रणजितदादांच्या नेतृत्त्वात सत्तांतर घडवून आणणार असल्याचे, खासदार गटाचे कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगत आहेत.
कार्यकर्त्यांची फळी, मतदारांचा आजवरचा कल आणि नेतृत्त्वाची ताकद या गोष्टींचा मागोवा घेतल्यास सद्यस्थितीत तरी ना.श्रीमंत रामराजे यांच्या सत्तेला खा.रणजितसिंह सहजासहजी छेद देण्यात यशस्वी ठरतील असे चित्र नसले तरी राजेगटातील इच्छुकांच्या वाढत्या संख्येतून नाराजीचा गट निर्माण झाल्यास खासदार गटाला याचा फायदा उठवता येईल कां? याबाबत चर्चांचा खल होताना शहरात दिसून येत आहे.