स्थैर्य, दि.१६: रासायनिक व आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे मनुष्याच्या शरीरावर रसायनांचा परिणाम होतो. तसेच त्यामुळे जमिनीची धूप होते. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकांवर फवारली जाणारी रसायने व रसायनांचा अर्क काही प्रमाणात आपल्या शेतमाला मध्ये किंवा पिकांमध्ये उतरला जातो ही रसायने आपल्या शरीराला हानीकारक ठरतात .त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून फलटण तालुक्यातील गाव फरांदवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री. बाळू शिंदे यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला .प्रथम त्यांच्या मनात विचार आला की कमीतकमी आपल्या परिवारातील लोकांनी तरी रसायनमुक्त अन्न घ्यावे म्हणून त्यांनी काही मोजक्या जमिनीमध्ये घरगुती वापरासाठी कांदा,लसूण ,हरभरा, ज्वारी ,गहू, इतर भाजीपाला पिकवला सुरुवातीला त्यांना उत्पन्न कमी मिळाले पण आपण रसायनविरहित अन्नग्रहण करतो याचे त्यांना समाधान मिळाले. सेंद्रिय शेतीचा काही अनुभव नसल्यामुळे त्यांनी माननीय श्री. सुभाष पाळेकर यांचे झिरो बजेट शेती यावर मार्गदर्शन घेऊन शेती चालू केली.
पर्जन्यमानात घट झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडणारे दर पाहता शेती उद्योग धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने पीक न घेता या शेतकऱ्याने उसाचे सेंद्रिय पद्धतीने पीक घेतले. योग्य नियोजन करून मेहनत व चिकाटीच्या जोरावर शेती केली. आज पाहिले तर त्यांनी दीड एकर जमिनीवर ऊस घेतला आहे .चांगले लागवडीखालील उसाचे बेणे निवडले त्यावर सेंद्रिय पद्धतीने बीजप्रक्रिया करून घेतली.जमीनीत शेणखत टाकले, सऱ्या पाडल्या व उसाची लागवड केली. प्रत्येक पाण्याच्या पाळीला त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे जीवामृत दिले. तणांची वाढ रोखण्यासाठी वेळोवेळी खुरपणी केली .त्यांच्या म्हणण्यानुसार जर सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर किडीचा पिकावर प्रादुर्भाव कमी दिसतो जरी किडीचा प्रादुर्भाव थोड्या फार प्रमाणात आढळला तर दशपर्णी अर्क फवारले. अशा प्रकारे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पन्न घेतले .सेंद्रिय पद्धतीने ऊस घेण्याची त्यांची दुसरी वेळ आहे .अंदाजे त्यांना प्रति एकर 30-35 टन सेंद्रिय ऊस मिळतो .यामधील काही उस निर्यात केला जातो व काही उसाची प्रक्रिया करून गूळ बनवला जातो या पिका मधून त्यांना चांगलाच फायदा होत आहे .त्यांनी त्यांच्या सेंद्रिय गुळाला चांगला बाजार भाव मिळवला आहे.
नियोजन आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर शेती सुकर होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अशी माहिती कृषी महाविद्यालय पुणे चा कृषी विद्यार्थी ओंकार विनायक बेंद्रे यांनी दिली.