दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । मुंबई । “शिक्षणाची बंद कवाडे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमुळे शिक्षणाची बंद कवाडे मनुवादी समाजव्यवस्थेच्या बंधनात बंद असलेल्या सर्वच स्तरातील सर्वच स्त्री, पुरुषांसाठी खुले झाले त्यामुळे खुल्या वर्गातून तन्वी पवार (अजगोली) ही CBS परीक्षेत ९९% गुण प्राप्त करू शकते तर दिनेश पवार CWS मध्ये Ph.D करू शकतात ही किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या क्रांतीमुळे होत आहे व समाजातील तळागळातून अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पदवीधर, MPSC, UPSC, स्पर्धा परीक्षा व शिक्षणाच्या अनेकविध शाखांमधून आमचे विध्यार्थी भरारी घेत आहेत, आज समाजातील अनेक विद्यार्थी हे आर्थिक बाजूने कमकुवत असले तरी परिस्थितीची झळ जोवर काळजाला झोंबत नाही तोवर शिक्षणाचा ध्यास कधीही बदलत नाही” असे उद्गार बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व शास्ता दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख विश्वस्त या नात्याने संजय पवार यांनी केले.
सदर कार्यक्रम सिद्धार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल या ठिकाणी नुकताच पार पडला, सदर प्रसंगी अनपेक्षितपणे लाभलेले प्रमुख अतिथी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत व सरचिटणीस राजेशजी घाडगे यांच्या शुभहस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली व विश्वस्त संजय पवार यांनी दीप प्रज्वलन केले व संदीप गमरे यांनी सुमधुर आवाजात त्रिशरण पठण केले, संघाचे गाव शाखेचे माजी चिटणीस मारुती जाधव, माजी प्रमुख विश्वस्त व्ही. व्ही. जाधव व गतवर्षी कालकथित झालेल्या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस दोन मिनिटं मौन पालन करून विनम्र अभिवादन करण्यात आले, स्वागताध्यक्ष दीपक मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरवात केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयजी तांबे यांनी मधुर वाणीने करून उपस्थितांस मंत्रमुग्ध केले तर प्रास्ताविक सादर करताना संघाचे कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते यांनी संघाने केलेल्या कामकाजावर दृष्टिक्षेप टाकत संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वर्षावास कार्यक्रम, धम्मशिबिर, श्रामनेर शिबिर, पूरग्रस्तांना मदतीचा हात, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, संघाला आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी गुहागर पतसंस्थेची निर्मिती, स्पर्धा परीक्षा करता व्याख्यानमाला अश्या अनेक उपक्रमांची माहिती देऊन संघाच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला, तसेच संघाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नवीन कमिटीने जे योगदान दिले त्याबद्दल त्यांचे ही कौतुक केले.
तद्नंतर प्रमुख विश्वस्त संजयजी पवार, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदासजी गमरे, के. सी. जाधव, शिक्षण कमिटी अध्यक्ष नितीन नागे, न्यायदान कमिटी अध्यक्ष शशिकांत मोहिते, विवाह कमिटी अध्यक्ष संदीप गमरे, कार्यक्रम अध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांस मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, भेटवस्तू व पुष्य देऊन त्याना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास विविध शाखा, त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सर्वांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शास्ता दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. संदीप गमरे, अमित पवार, सचिन पवार, विनोद मोहिते आदी कलावंतांनी आपल्या सुमधुर आवाजात गीतगायन कार्यक्रम सादर केला, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या संजय मोहिते, प्रभाकर पवार, सुरेश पवार तसेच सर्वच विभाग अधिकारी, विभाग प्रमुख, विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते, महिला मंडळ सर्वांचे आभार मानून संघाचे सरचिटणीस संजय तांबे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.