ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत !


दैनिक स्थैर्य | दि. 28 जून 2025 | फलटण | पहाटेच्या आरतीनंतर तरडगावहून निघालेला श्री संतश्रेष्ठ माऊलींचा पालखी सोहळा आज सायंकाळी ५.०० वाजता फलटण नगर परिषदेच्या हद्दीत जिंती नाका येथे पोहोचला. येथे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह नगरवासियांनी सोहळ्याचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता विमानतळावर पोहोचून सोहळा एक दिवसाच्या मुकामासाठी फलटण नगरीत विसावला.

आज पहाटे तरडगाव येथे माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींची नित्य पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ६.०० वाजता हा सोहळा ऐतिहासिक फलटणनगरीकडे मार्गस्थ झाला. स्वच्छ व निरभ्र वातावरणात निघालेला हा पालखी सोहळा दत्त मंदिर, काळज येथे आला. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तो सुरवडीकडे मार्गस्थ झाला. सकाळी ९.०० वाजता सोहळा सुरवडी येथे पोहोचल्यानंतर सोहळ्याने सकाळची न्याहरी घेतली. त्यानंतर सोहळा नैवेद्य व विश्रांतीसाठी सकाळी ११.३० वाजता निंभोरे ओढा येथे पोहोचला. येथे सोहळ्याने दुपारचे भोजन व विश्रांती घेतली.

सकाळपासून वाटचालीत कधी तळपता सूर्य तर मध्येच कधीतरी ढगाळ वातावरण निर्माण होत होते. वारकर्‍यांना वाटचालीत पाऊस पडेल, अशी आशा होती; परंतु प्रचंड उकाड्यामुळे वारकर्‍यांना वाटचालही असह्य झाली होती. मेघराजाच्या जलधारा अपेक्षित असलेल्या वारकर्‍यांना मात्र घामांच्या धारांचा जलाभिषेक होत होता. तरीही वारकर्‍यांचा उत्साह मात्र कायम होता. मुखी ‘विठ्ठल नामा’चा जयघोष व साथीला टाळ, मृदूंगाचा गजर यातच वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत होते. दुपारी ३.०० वाजता वडजल येथील विश्रांती घेऊन सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सायं. ५.०० वाजता फलटण नगरपालिकेच्या हद्दीत जिंती नाका येथे अश्व पोहोचले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता माऊलींची पालखी जिंती नाका येथे पोहोचली. येथे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह नगरवासियांनी सोहळ्याचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

त्यानंतर ५.३० वाजता अश्व मलठण, उंबरेश्वर चौक, संत हरीबाबा मंदिरमार्गे तीन बत्ती चौकातून कसबा पेठेत पोहोचले. अश्वापाठोपाठ सायंकाळी ६.०० वाजता माऊलींचे आगमन झाले. येथे बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने माऊलींच्या सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुढे नाईक-निंबाळकरांच्यावतीने श्रीराम मंदिर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह नाईक-निंबाळकर परिवारातील सदस्य व नगरवासियांनी स्वागत केले व दर्शन घेतले. येथील स्वागत स्वीकारून सोहळा गांधी चौक, शासकीय कार्यालय मार्गे सायंकाळी विमानतळावर पोहोचला.

फलटण नगरीतील १०० एकराच्या विस्तीर्ण अशा विमानतळावर मध्यभागी ज्ञानराजांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे, तर आजूबाजुला मानकर्‍यांचे तंबू लावण्यात आले आहेत. यावर नजर फिरवली असता मध्यभागी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज तर सभोवताली जणू वैष्णवांचा दरबारच भरल्याचे चित्र दिसत होते. ‘माऊली माऊली’ नामाच्या जयघोषात पालखी रथातून उतरवून समाज आरतीसाठी मध्यभागी आणण्यात आली. ७.०० वाजता टाळ, मृदुंगाच्या गजरात माऊली व तुकोबाराय यांची आरती म्हटल्यानंतर हा सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी जैन धर्मीय व महानुभाव पंथांची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलटण नगरीत विसावला.

मानकर्‍यांचा सन्मान

फलटण नगरपालिकेच्यावतीने संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी तुकाराम, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे व मानकर्‍यांचा फेटा व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!