स्थैर्य, सातारा, दि. 22 :जावली तालुक्यात करोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती करोनावर मात करून घरी परतत असताना तालुक्यातील बाधितांचा आकडा काही थांबता थांबेना. शिंदेवाडीत 1, केडंबेत 1 तर म्हाते खुर्द येथे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने या गावांमध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जावली तालुक्यात करोना बाधितांचा आकडा 81 वर गेला आहे.
शिंदेवाडी येथील मृत बाधित युवकाची पत्नीही बाधित निघाली आहे. जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 40 वर्षीय युवक आपल्या पत्नी व मुलासह 12 जून रोजी मुंबईवरून आला होता. ग्रामस्तरीय कमिटीने या कुटुंबाला होम कॉरन्ंटाईन केले होते. परंतु 16 जून रोजी त्याला श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी खाजगी गाडीने दवाखान्यात नेले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्युपश्चात त्याचे घशाचे स्वॅबचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
दरम्यान प्रशासकीय यंत्रणा गावात दाखल होवून जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, मेढ्याचे स.पो.नि. नीळकंठ राठोड, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, मंडलाधिकारी वेलकर आदींनी शिंदेवाडीला भेट देऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या.
प्रशासनाने मृत्यू पावलेल्या युवकाची पत्नी आणि मुलाला रायगाव येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.त्या दोघांचे तसेच या कुटुंबाबरोबर मुंबईवरून आलेल्या वाघदरे येथील महिलेचे असे तिघांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले आहेत. सांगवी येथील गाडीने हे कुटुंब गावाला आले होते. त्या गाडी चालकाच्या घशातील स्त्राव मुंबईत येथे तपासणीसाठी घेण्यात आला आहेत. तर मृत्यू पावलेल्या युवकाला खाजगी गाडीतून दवाखान्यात नेणार्या चौघांना होम कॉरंन्टाइन केले असून त्याच्या घशाचे स्त्राव सात दिवसांनी तापसणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले आहे.
दरम्यान, बाधित मयत युवकाच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेने गाव अगोदरच सील केले आहे. दरम्यान, जावलीत आजपर्यंत बाधित रुग्णांचा आकडा 81 पोहोचला असून 7 जणांचा करोना ने बळी घेतला आहे.
म्हाते खुर्द गाव पुन्हा चर्चेत..या गावातील आर्यन दळवीच्या मृत्यूमुळे चर्चेत असणारे म्हाते खुर्द गाव पुन्हा करोना ने चर्चेत आले आहे. या गावातील 6 जणांचे कुटुंब मुंबईवरून गावी आले होते. गावी येतानाच या सहा पैकी 62 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिलेच्या घशातील स्वॅब शिरवळ चेक नाक्यावर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने घेतले होते. त्यांचा रिपोर्ट दि. 20 रोजी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आला. आज सकाळीच तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी गावाला भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. व खबरदारीच्या सुचना केल्या. बाधीत पती व पत्नीला पाचगणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले असून कुटुंबातील अन्य चार सदस्यांना रायगाव येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. डॉ. आश्विनी कारंडे, आरोग्य सेवक आर. एस. यादव, एस. वाय. पळप, एन. टी. पवार, वाय. वाय. सावंत, आशासेविका कांचन दळवी, आरोग्य सेविका अरुणा दळवी, ग्रामसेवक जाधव, सरपंच सौ. विमल दळवी, दक्षता कमिटी यांनी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
केळघर विभागात पुन्हा करोना चा प्रवेश..वरोशी, आंबेघर, गवडी या गावांनंतर केळघर विभागात करोना ने केडंबे गावात प्रवेश केला असून या गावातील बाहेर गावावरून आलेल्या 65 वर्षीय पुरुषाचा रात्री उशिरा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने केडंबे गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यंत तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 81 झाली असून सात जणांचा करोना ने बळी घेतला आहे. तालुक्यातील लोकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे स्थानिक जावलीतील लोक कोरोना संक्रमणापासून आजपर्यंत सुरक्षित राहिले आहेत. परंतु मेढा, केळघर, कुडाळ येथील बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी गर्दी तसेच नागरिक व व्यापारी यांच्यामध्ये करोना बाबत कोणतेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. सोशल डिस्टन्िंसगचा पूर्ण फज्जाच उडाला असून सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के लोक मास्कशिवाय बाजारात फिरत आहेत.
रुग्णांनी आपले पूर्वीची तसेच कोणत्याही आजाराची लक्षणे लपवून ठेवू नयेत. वेळीच उपचार घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. अन्यथा हा गाफीलपणा आपल्या स्वतःच्या जीवावर बेतू शकतो तसेच यामुळे आपले कुटुंब व परिसरातील लोक अडचणीत येऊ शकतात. तरी यापुढे लोकांनी अधिक सतर्क रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे.