स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरील जिहे गाव तसेच सदन गावात दि. २९ रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्या रुग्णांनंतर गावात कोरोना बाधितांची माळच लागली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात १९ रुग्ण आढळून आले असून सातारा तालुक्यातील एकट्या जिहेमध्ये आतापर्यंत २६ रुग्ण झाले आहेत. दुधाच्या रतिबाने गावात सगळा गुणाकार केला आहे. तर एका माळकऱ्यांच्या सवयीमुळे बेरीज झाली आहे,अशी गावात चर्चा आहे. दरम्यान, गावात कोणीच कोणाच ऐकत नसून एकट्या होमगार्डवर गावच्या सुरक्षेची भिस्त आहे. पोलीसांच्याऐवजी येथे शिक्षक बंदोबस्ताला असून ते केवळ पाच ते सात या वेळेत असतात. त्यांचेही कोणीही ऐकत नाही. साखळी कशी तोडायची हाच प्रश्न निर्माण झाला असून खालची आणि वरची दोन्ही आळ्याही आता सील केल्या आहेत.
सातारा तालुक्यातील राजकीय दृष्टय़ा संवेदनशील असलेले जिहे या गावात कोरोनाने कशी एन्ट्री केली याबाबत गावात अफवांचे पिक उटले आहे. एकजण मुंबईहून आल्याची माहिती दडवल्याचे सांगण्यात येते. तर एकजण बाहेर जेवायला गेला आणि येताना कोरोना घेवून आल्याचे सांगण्यात येते. दि. २९ रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला. त्या नंतर गावामध्ये कोरोनाबाधितांची रांगच सुरु झाली आहे. सातारा येथील शाहुनगरमध्ये त्याच गावातील काहीजण राहतात. त्या कुटुंबातील काही जणांनाही कोरोनाची बाधा झाली. दुधाचा रतिब गावात अनेकांच्या घरात असल्याने कोरोनाचे वाटपही गुणाकाराने झाल्याची चर्चा आहे. तर एका माळकऱयास गावभर फिरण्याची सवय आहे. नुसतेच विचारपूस करत ह्याच्या घरात जायचे, त्यांच्या घरात जायचे. विचारपूस करायची. त्यामुळेही कोरोनाची बेरीज होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गावामध्ये आता कोरोनामुळे खालची आळी आणि वरची आळीही सील करण्यात आली असून बंदोबस्ताला फक्त एकच होमगार्ड आहे. त्याच्या सोबतीला दोन शिक्षक आहेत. त्यांचे कोणीही ऐकत नाहीत. गावातील तरुण मुलांच्या तर ग्रामसमितीवरच दादागिरी सुरु असून ही साखळी तुटणार कशी अशी गावातील ज्येष्टांना काळजी लागून राहिली आहे.
आमदार महेश शिंदे यांच्यापासून खासदार उदयनराजेंना फोनाफोनीगावामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील ज्येष्ठ मंडळींनी आमदार महेश शिंदे, खासदार उदयनराजे यांना फोन करुन गावाकडे जरा लक्ष द्या अशी विनंती केली. आमदार महेश शिंदे यांनी तहसीलदार आशा होळकर यांच्याशी संपर्क साधून गावाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
शुक्रवारी रात्री १९ रुग्ण=जिहेत शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात ४९, ५७, २०, ८, ६८, ४३, ६१, ८१, ६२ वर्षाचे पुरुष, ४२, ५७, ४, ३०, १९, ३, १०, ३२, ७०, ५५ वर्षाची महिला यांचा समावेश आहे.