दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आळढली असल्याचे वृत्त काही मीडियावर प्रसारित होत आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
याबाबत डॉ. चव्हाण यांनी सांगितले, बुधवार दि.12 जानेवारी 2022 रोजी काही चलचित्र वाहिनी मधील रिपोर्टर माझे कार्यालयामध्ये येऊन जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आढळली आहे, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर त्यांनी मला मानवी कवटीची चित्रफीत दाखवली.
मी व माझे सहकारी डॉ. सुभाष कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तसेच डॉ. राहुलदेव खाडे फोरेन्सिक एक्सर्प्ट या बाबीची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी संबंधित पत्रकारासोबत पाहणीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल परिसराबाहेर श्री. इंगवले यांचे मटण दुकानाच्या मागील बाजूस नाल्यालगत मानवी कवटी आहे असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता कोणतीही मानवी कवटी आढळून आली नाही.
सदरची मानवी कवटी ही सिव्हिल हॉस्पिटल सातारा च्या आवारात सापडली असे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे आहे. तसेच या घटनेशी सिव्हिल हॉस्पिटल सातारा प्रशासनाचा काहीही संबंध नाही.
या गोष्टीची पोलीस यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.