पाटण येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.आर.श्रीराम यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । सातारा । पाटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, पाटणचे दिवाणी न्यायाधीश क. स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रमोद पाटील, पाटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश माटेकर आदी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम म्हणाले, न्यायालय न्याय मंदिर आहे. लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. या न्याय मंदिरात न्याय देण्याचे काम न्यायाधीश व वकील करत असतात हे काम श्रेष्ठ आहे.

न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक पक्षकारांच्या अडचणी समूजन घ्या. त्यांचा आदर करुन सहकार्याची भूमिका सदैव ठेवा. तसेच वकिलांनी न्याय देण्याच्या भूमिकेकडे सामाजिक भावनेतून काम करावे. पाटण येथील इमारत सुंदर आहे. या नवीन इमारतीमुळे न्याय देण्याचे काम नक्की उंचवावेल, असा विश्वासही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांनी व्यक्त केला.

पाटण डोंगरी व दुर्गम भाग आहे. या दुर्गम भागात न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. हे न्यायालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरु करावे. जिल्ह्यात इतर न्यायालयांचे काम सुरु आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्यावरही लक्ष केंद्रीत करावे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे म्हणाल्या, न्यायदानाला कोठेही तड न जाता पारदर्शक व भेदभाव न करता न्याय देणे न्यायाधीशांची जबाबदारी आहे. पाटण येथील न्यायालयीन इमारतीत पहिला व दुसरा मजला 600.47 चौ.मी. आहे. या इमारतीमध्ये वैकल्पिक वाद निवारण कक्ष, लोक अदालत कक्ष, महिला व पुरुष स्वतंत्र विधीज्ञ कक्ष, ग्रंथालय, सर्वर रुम, मुद्देमाल कक्ष, अभिलेख कक्ष व स्ट्राँग रुम इत्यादी सोयी-सुविधा असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे तहसीलदार रमेश पाटील, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, कार्यकारी अभियंता विद्युत मानसिंग शिंदे, न्यायालयीन अधिकारी, वकील, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!