दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
श्री. फेबिग म्हणाले, जर्मनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक असून उत्पादन, स्वयंचलित वाहन व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीत आज अंदाजे ३५ हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून अलिकडे हे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनी भारतासोबत हरित ऊर्जा, मेट्रो रेल, जलव्यवस्थापन आदी क्षेत्रात सहकार्य करीत असून भारताशी सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
राज्यातील विद्यापीठे व जर्मनीतील शिक्षण संस्थांमध्ये सहकार्य वाढविल्यास आपण कुलपती या नात्याने निश्चितच मदत करू असे राज्यपालांनी सांगितले. जर्मनीतील विद्यार्थ्यांनी राज्यातील विद्यापीठांना भेट द्यावी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील जर्मनीच्या शिक्षण संस्थांना भेट द्यावी तसेच उभयपक्षी संस्कृती, शिक्षण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.