माऊलींच्या पादुकांना टाळमृदूंगाच्या गजरात नीरास्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात दाखल


दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२५ | फलटण | ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना आज टाळमृदूंगाच्या गजरात नीरास्नान घालण्यात आले. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघाला. नीरामधील दत्तघाटावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. आज हा वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होऊन लोणंदच्या पालखी तळावर विसावला आहे.

हरिनामाच्या जयघोषात आज माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालण्यात आले. या स्नानाला पालखी सोहळ्यात अनन्यासाधारण महत्व आहे. आषाढी वारीत ज्ञानोबांच्या पादुकांना तीनवेळा स्नान घातले जाते. नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घातले जायचे. नीरा नदीवरील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या गेल्या. नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. गेल्या कित्येक वर्षांची या स्नानाला महत्त्व आहे.

पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘माऊली माऊली’, ‘विठ्ठल विठ्ठल’ अशा गजरात व टाळमृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुणे जिल्ह्यातून आज सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. नीरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीच्या पाण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी वारकर्‍यांनी माऊली माऊलीचा जोरात गजर केला.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आळंदी येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करत आज सातारा जिल्ह्यात दाखल झाला. यावेळी पालखी सोहळ्याचे व वारकर्‍यांचे सातारा जिल्हा प्रशासनातर्फे उस्फूर्त असे स्वागत करण्यात आले. पालखी स्वागतासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बुधवारी पालखी सोहळा वाल्हे येथे मुक्कामास होता. आज सकाळी वाल्हे येथून नीरा मार्गे हा पालखी सोहळा ज्ञानोबा माऊलींच्या नामाचा जयघोष करत नीरा येथे दुपारचा विसावा घेऊन लोणंद येथे सातारा जिल्ह्यात मुक्कामास आला.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच पोलीस विभागाने पालखीला मानवंदना दिली. स्वागतानंतर पालखी सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. हा सोहळा सायंकाळी लोणंद मुक्कामी विसावला. पालखी सोहळा आज लोणंद मुक्कामी असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!