दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून येथील पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या रुग्ण सहाय्यता कक्षाच्या नव्या वेब ॲप्लिकेशनचे उद्घाटन बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेब ॲप्लिकेशनमुळे रुग्ण सहाय्यता कक्ष हायटेक झाला असून या कक्षाशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हिस्ट्री एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामाध्यमातून रुग्ण सहाय्यता कक्षाच्या कामकाजाला गती येणार आहे. या रुग्ण सहाय्यता कक्षाचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना करुन देण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी रुग्ण सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये हा कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. या कक्षाच्या कामकाजात सुसुत्रता येण्यासाठी तसेच या कक्षाचे कामकाज अधिक गतीमान करण्यासाठी वेब ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रुग्ण सहाय्यता कक्षाशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सविस्तर माहिती नोंदवली जाणार आहे. या माहितीच्या माध्यमातून संबंधित रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी समन्वय व संपर्क ठेऊन त्यांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन करता येणार आहे. या नव्या वेब ॲप्लिकेशनमुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक शिबीरांची, योजनांची माहिती रुग्णांपर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. रुग्ण सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरु असणारे काम अधिक गतीमान करुन प्रत्येक गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच या कक्षाचा अधिकाधिक लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
आरोग्य विषयक मदत, माहिती व मार्गदर्शनाविषयीच्या अधिक माहितीसाठी रुग्ण सहाय्यता कक्षाचे प्रमुख डॉ. प्रशांत आष्टीकर यांच्या 7887671173 या क्रमांकावर संपर्क साधावा. पुणे येथे झालेल्या रुग्ण सहाय्यता कक्षाच्या ‘वेब ॲप्लिकेशन’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला द्रोपदी बाजीराव पाटील, सुप्रिया अमरसिंह पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे, रुग्ण सहाय्यता कक्षाचे प्रमुख डॉ. प्रशांत आष्टीकर, ॲप्लिकेशनचे तांत्रिक निर्माते सतिश पवार, सोनल मुसळे, चैत्राली मुसळे, विशाल हिरेमठ, विवेक सुर्यवंशी, पूनम मोहिते उपस्थित होते.