स्थैर्य, फलटण : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गोळ्या पॅकेट्सचे वितरण करताना शेजारी मान्यवर. |
स्थैर्य, फलटण : सर्वसामान्य लोक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात फलटण शहर व तालुक्यात आतापर्यंत चांगले यश आले आहे, आगामी काही दिवस ही एकजुट कायम ठेवून शासन/प्रशासनाने घालुन दिलेले नियम निकषांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी ही एकजुट कायम ठेवून काम करावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण पंचायत समिती माध्यमातून तालुक्यातील १३० गावातील ७१ हजार २२४ कुटुंबातील सर्व लहान थोर स्त्री/पुरुष, मुले अशा सुमारे ४ लाख लोकांना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरण ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, या गोळ्या तालुक्यातील ग्रामसेवक यांच्या कडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या, त्यावेळी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उप सभापती सौ. रेखाताई खरात, सर्व पंचायत समिती सदस्य, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार आर. सी. पाटील, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात पुणे, मुंबई किंवा अन्य शहरातून मोठ्या संख्येने आपलेच लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत, तेथे करोना परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यानंतर सुरक्षीत ठिकाण म्हणून ती सर्व मंडळी मोठ्या संख्येने येथे दाखल झाली, आपणही त्यांचे स्वागत करुन त्यांना सामावून घेतले आणि करोना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्यांना गावातील करोना संरक्षण समिती व प्रशासनाने सर्व बाबी समजावून दिल्या, ज्यांना होम कोरोंटाइन करण्याची आवश्यकता होती त्याचीही व्यवस्था ग्रामस्थ व कुटुंबीयांनी केल्याने फलटण शहर व तालुक्यात करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय आपण जपलेली एकजुट व त्यामाध्यमातून सर्व नियम निकषांची केलेली काटेकोर अंमलबजावणी याला दिले पाहिजे असे सांगून त्यासाठी सर्वांना धन्यवाद देत ही एकजुट अभेद्य ठेवण्याचे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
यापूर्वी अर्सेनिक अल्बम ३० सर्व कुटुंबांना देण्यात आले असून त्याचा परिणाम समाधानकारक झाल्याचे नमूद करीत त्यासाठी आता दुसऱ्यांदा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ह्या गोळ्या ग्रामसेवक, आशा वर्कर, आरोग्य सेविका वगैरेंच्या सूचनेनुसार सर्वांनी घ्याव्यात असे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे यांना होमियोपॅथी क्षेत्राचे ज्ञान व पदवी असल्याने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यातील ७१ हजार व फलटण शहरातील १६ हजार कुटुंबासाठी सुमारे ९० हजार अर्सेनिक अल्बम ३० या औषध गोळ्या बॉटल येथेच स्वतः तयार केल्या असल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी आवश्यक औषध, गोळ्या, पॅकेट्स वगैरे गोविंद फौंडेशन व के. बी. एक्स्पोर्टचे सचिन यादव यांनी उपलब्ध करुन दिल्याचे सांगताना आ. दीपक चव्हाण यांनी सचिन यादव, गोविंद फौंडेशन व गटविकास अधिकारी डॉ. सौ. गावडे यांचे अभिनंदन केले.
गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे यांनी अर्सेनिक अल्बम ३० वितरणाबाबत ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांना सविस्तर माहिती देऊन सर्वांना वितरण करुन त्याच्या वापराबाबत सूचना करण्याचे आवाहन केले.