
स्थैर्य, सातारा, दि. 25 सप्टेंबर : आधुनिक काळामध्ये सर्वत्र समस्यांचे प्रमाण वाढले आहे. जगावे कसे याबाबतचे प्रश्न निर्माण होत असतानाच आशादायक साहित्याची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूहाने आयोजित केलेल्या ‘वाचू आनंदे’ या साहित्य संमेलनामध्ये समारोपाच्या सत्रात ते मराठी भाषेसमोरील आव्हाने आणि संधी या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्वयंटॉक्सचे नवीन काळे, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, डॉ संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, ज्येष्ठ नेते मदन भोसले उपस्थित होते
डॉ उदय निरगुडकर पुढे म्हणाले, तुमच्यावर अन्याय करणारे कोणीतरी आसपास आहेत असा विचार साहित्याच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून समाजमनावर रुजवणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रकारच्या विचारामुळे नक्षली साहित्याचा प्रभाव वाढतो सकारात्मक समाजमन निर्माण करण्यासाठी आशादायक साहित्य त्यासाठीच महत्त्वाचे आहे.
स्वदेशीचा अभिमान बाळगणारे साहित्य जर निर्माण झाले तर आपोआप आशादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. इंटरनेटच्या प्रसारानंतर सोशल मीडियाचा प्रभावही वाढला आणि सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होण्याची शर्यतही वाढत चालली आहे. त्याला साहित्य म्हणायचे की नाही हा संशोधनाचा मुद्दा असला तरी ही शर्यतही दखल घेण्यासारखी आहे. आधुनिक काळात कॉमर्सची भाषा म्हणजेच उद्योगाची भाषा सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या भाषेला महत्त्व देऊनही विविध प्रकारचे साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे. असेही डॉक्टर उदय निरगुडकर म्हणाले,
विविध प्रकारच्या छोट्या छोट्या उपक्रमांनी मराठी साहित्याचा प्रसार होत असला तरी राज्यातील ग्रंथालयांची स्थिती मात्र चिंताजनक आहे. वाचनालयाचे संचालक ज्येष्ठ किंवा अति जेष्ठ असल्यामुळे त्यांच्याकडे आधुनिकतेची कास नाही. तंत्रज्ञान सोशल मीडियाचे ज्ञान त्यांना नाही गतवैभवाचे उमाळे गाण्यातच त्यांना रस आहे. राज्यातील समृध्द वाचनालये आणि विविध छोटे साहित्यविषयक उपक्रम यामुळेच मराठी भाषेसमोरील आव्हाने दूर होतील, असेही डॉ. उदय निरगुडकर यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक करताना संमेलनाच्या उपक्रमाची माहिती दिली. नवीन काळे यांनी स्वयंटॉक्स या उपक्रमाची सुरुवात कशी झाली आणि डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यामुळे हा उपक्रम कसा लोकप्रिय झाला हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास जोशी यांनी केले. मुकुंद फडके यांनी आभार मानले.