फळबाग लागवड हि काळाची गरज : सुभाष भांबुरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सुभाष भांबुरे यांच्या शेतामध्ये पेरू व लिंबू या फळाची लागवड करताना सौ. वसुधा सुभाष भांबुरे समवेत जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, दशरथ फुले, शरद कोल्हे, अजय माळवे, नासिर शिकलगार व चैतन्य रुद्रभटे

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामध्ये पूर्वी पासून विविध ठिकाणी फळबाग लागवड करणारे शेतकरी सर्वांना पाहायला मिळाले आहेत. तालुक्याचा इतिहास पाहिला तर फलटणला पूर्वी फलपत्थनपूर म्हणून ओळखले जात होते. या इतिहासाच्या खोलात जाऊन माहिती घेतली असता असे आढळून येते की, फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फळांचे उत्पन्न घेतले जात होते. म्हणूनच फलटणला फलपत्थनपूर असे नाव पडले असावे व हीच फलटणची परंपरा कायम ठेवण्यासाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे, असे मत फरांदवाडी कृषि क्रांति फा्र्मस ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे व्हाईस चेअरमन सुभाष भांबुरे यांनी दिलेल्या युट्युब चॅनेलच्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

या वेळी भांबुरे म्हणाले कि, फलटण तालुक्यामध्ये बरेच शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. उसाच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. शेतीमध्ये वर्षानुवर्षे उसाचे पीक घेतल्यामुळे बऱ्याच जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत. त्या जमिनीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीचे उत्पादन घेता येत नाही. अशा जमिनीवर सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने जमिनीवर प्रक्रिया करून सेंद्रिय पद्धतीने फळबागाची लागवड करता येऊ शकते. सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवडीसाठी आमच्या कंपनीद्वारे तज्ञ लोकांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी विनामोबदला आयोजित केलेले आहे. त्याचा लाभ फलटण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेऊन आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पद्धतीची फळबाग लागवड करावी. सेंद्रिय पद्धतीच्या फळांना बाजारपेठेमध्ये व परदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा आर्थिक फायदा मिळू शकतो, असेही भांबुरे यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!