दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । उंब्रज । काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारितेत अमुलाग्र बदल झाला आहे. आज पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारितेरवर भर द्यायला हवा आणि समाजप्रतिची न्यायीक भूमिका जपण्याची गरज, असल्याचे मत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केले.
द पॉवर ऑफ मिडिया फौंडेशन महाराष्ट्र, सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय उंब्रज, रोटरी क्लब ऑफ उंब्रज, वसुंधरा पर्यावरण संशोधन व संवर्धन संस्था उंब्रज यांच्या संयुक्तीक विद्यमाने जगताप महिला महाविद्यालयात उंब्रज व मसूर विभागातील पत्रकारांना पत्रकार सेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी सायबर सेल सातारचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, रयत कॉन्सीलचे सदस्य द. श्री. जाधव, द पॉवर ऑफ मिडिया फौंडेशनचे राज्य सचिव अनिल कदम, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, प्राचार्य संजय कांबळे, द पॉवर ऑफ मिडिया फौंडशनचे जिल्हाध्यक्ष पराग शेणोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तम दिघे म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्ताची सुरूवात केली. त्याकाळी सामाजिक विषय हाताळून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, लोकमान्य टिळक, आगरकर आदी थोर व्यक्तींंनी वेगवेगळी वृत्तपत्रे काढून सोशीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात वृत्तपत्रे आणि पत्रकारांची भूमिका प्रभावी ठरली आहे. असे असलेतरी काळानरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी वास्तव आणि परिस्थितीचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याची नितांत गरज आहे.
दरम्यान, द. श्री. जाधव, प्राचार्य संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्तविकात द पॉवर ऑफ मिडिया फौंडशनच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन भविष्यात महिला पत्रकार घडवण्यासाठी महिला महाविद्यालयाने पुढाकार घेण्याची मागणी संघटनेचे राज्य सचिव अनिल कदम यांनी केली. यावेळी उंब्रज आणि मसूर विभागातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
सुत्रसंचालन तानाजी कदम यांनी केले तर आभार पराग शेणोलकर यांनी मानले. यावेळी मसूर व उंब्रज विभागातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
सेवा गौरव पुरस्काराचे मानकरी
-
सकाळ वृत्तसमुहाचे चीफ रिपोर्टर प्रवीण जाधव सातारा.
-
पुढारी वृत्तसमुहाचे मसूर विभाग प्रतिनिधी दिलीप माने.
-
प्रभात वृत्तसमुहाचे उंब्रज विभाग प्रतिनिधी दिलीपराज चव्हाण.
-
तरूणभारत वृत्तसमुहाचे चोरे विभाग प्रतिनिधी दिलीप साळुंखे.
-
सकाळ वृत्तपत्र समुहाचे तासवडे प्रतिनिधी तानाजी पवार.
समाजाच्या जडणडणीत वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे योगदान मोलाच राहिले आहे. पत्रकारिता करत असताना पत्रकांरानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांना तोंड देवून समाजाप्रति त्यांची असेलेली तळमळ वाखाणण्याजोगी आहे.
– अरूण देवकर, पोलीस निरीक्षक सायबर सेल सातारा.
प्रशासनाची भूमिका समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करत आहेत. उंब्रज आणि मसूर विभागातील पत्रकारांचे कोविड महामारीच्या काळात पोलीस प्रशासनास मोठे सहकार्य झाले. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकारांनी काम केले. मी उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यापासून पाहिल्यांदाच पत्रकारांच्या गौरवाचा एवढा चांगला कार्यक्रम पाहत आहे, असे कार्यक्रम आयोजित करून पत्रकारांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकण्याची गरज आहे.
– अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक उंब्रज.