
दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सावित्रीबाई या भारतीय इतिहासातील सर्वाधिक आधुनिक विचाराची स्त्री आहेत. रूढ इतिहासात त्यांच्या स्वतःच्या बुद्धीने घेतलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांनी जाणीवेने केलेल्या प्रत्येक कामाचा शोध घेऊन आज स्त्रियांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. आज बहुतांशी स्त्रिया या परंपरेच्या वाहक आहेत. सामाजिक परिवर्तन घडविण्यात त्या मोठे योगदान देऊ शकतात ,पण नेतृत्व विकास करण्याची अतिशय गरज आहे. आपले माणूसपण समृद्ध करण्यासाठी ज्ञान आणि विज्ञान घेऊन परिणामकारक व प्रभावी काम करण्याची अतिशय गरज आहे. त्या घर बदलू शकतात तसा नवा देश देखील घडवू शकतात. त्यासाठीच सावित्रीबाई फुले यांचा आधुनिक दृष्टीकोन सर्व स्त्रियांनी अभ्यासला पाहिजे आणि आणखी स्व व समाजहिताचे नवे बदल घडवले पाहिजेत‘’ असे मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अग्रणी कॉलेज असलेल्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये महिला शिक्षण दिनानिमित्त महिला सामर्थ्यशीलता समितीने आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्या प्रा. डॉ.सुजाता अशोकराव भोईटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आप्पासाहेब तोरणे,उपप्राचार्य डॉ.जय चव्हाण,डॉ.गीतांजली उत्तेकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले यांचे वेगळेपण सांगताना उमेश सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘साऊ’ या ग्रंथातील संशोधनात्मक विश्लेषण करत प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की,’’ सावित्रीबाई या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात हिम्मतवान
होत्या. ज्या काळात स्त्रियांनी उंबरा ओलांडू नये असे समाजसंकेत होते ते धुडकावून त्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी उंबरा ओलांडला. मिचेलबाई यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यांना संस्कृत,इंग्रजी,मोडी या भाषा येत होत्या. सावित्रीबाई यांच्या वाचनात ग्रहलाघव ,खगोल शास्त्रीय ग्रंथ,मराठी म्हणी ,हिंदुस्थानचा इतिहास ,भूगोल ,सिंहासन बत्तीशी ,इसापनीती ,गद्य रत्नमाला ,सॉक्रेटीस चरित्र ,इंग्रजी संभाषण ही पुस्तके होती. अधिक ग्रंथ असावेत असे त्यांच्या विद्यार्थिनी लिहितात. सावितीबाई यांनी १८५४ ला काव्यफुले व १८९१ ला बावन्नकशी सुबोध रत्नाकर असे दोन कवितासंग्रह लिहिले. उद्योग ,विद्याज्ञान ,सदाचरण ,व्यसने ,कर्ज या
जीवनविषयक विषयावर त्यांनी लेखन केले आहे. महात्मा फुले यांच्या तृतीय रत्न या पहिल्या ग्रंथाच्या अगोदर सावित्रीबाई यांनी काव्य्फुले क्वितासंग्र्ह लिहिलेला आहे. १८५२ ला मिसेस जोन्स यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महिला सेवामंडळ पुण्यात सुरु केले. विधवा विवाह ,प्रौढ शिक्षण ,दारुड्या नवरयाच्या जाचातून मुक्ती या प्रश्नावर त्यांनी काम केले. स्त्रियांच्यामध्ये असणारी श्रेष्ठ कनिष्ठ अशी जातीय दृष्टी काढून त्यांनी स्त्रियांना समानदृष्टी शिकवली. विधवा असलेल्या स्त्रियांना होणारी बाळे सांभाळण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपन हे मानवी हक्काच्या विरुद्ध आहे हे त्यांनी सांगितले व न्हाव्यांचा संप घडवून आणला. स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद
अस्पृश्यांना खुला करून दिला. १८७७ च्या दुष्काळात अन्नछत्र सुरु केले. दत्तक घेतलेला पुत्र यशवंत व राधा यांचा आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. पतीच्या सामाजिक कार्यावर विश्वास ठेवून त्यांनी स्वतःच्या माहेरची जातीय मते नाकारली. गणेश ब्राह्मण व सारजा यांना गावटग्यांच्या मारहाणीपासून वाचवले.सावित्रीबाईनी जोतीरावांच्या ५ भाषणाचे संपादन केले आहे, सावित्रीबाई वक्ता होत्या. जोतीराव वारल्यानंतर त्यांनी स्वतः रूढी नाकारून स्वतः टिटवे हातात धरले. सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. प्लेग साथीच्या काळात स्वतः निर्भय होऊन त्यांनी काम केले.एका अस्पृश्य मुलाला वैद्यकीय उपचारास त्यांनी नेले त्यात उद्भवलेल्या
प्लेगच्या आजारात त्यांचे निद्ध्न झाले. समाजाला समर्पित झालेली आधुनिक विचारांची कृतीशील स्त्री या सावित्रीबाई होत्या. त्यांनी ब्राह्मण विचाराने आलेली विषमता नाकारली. शिक्षण देऊन लोक जागृती केली. विषमतावादी मनु लाथाडून समतावादी झाले पाहिजे हा विचार निर्भयपणे त्यांनी मांडला. माणुसकीचे नाते जपतात त्यांना संत म्हणावे हा दृष्टीकोन त्यांनी दिला. मागासवृत्ती नाकारून त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार केला. शिक्षणाने आपल्यातले जनावरी अज्ञान जाईल आणि आपण माणूस होऊ या मूल्यविचार त्यांनी समाजाला दिला. कुटुंब जगवण्यासाठी उद्योग हवा,दुसऱ्याला मदत करा ,निर्व्यसनी राहा ,अज्ञानातून मुक्त व्हा, बुद्धीचा उपयोग करा, देव
काल्पनिक आहेत, त्यावर विसंबून राहू नका ,बुद्धीचा उपयोग करत नाही तो माणूसच नाही ,दया ,परोपकार सारे ठीक आहे पण त्यातून आळसी माणसे तयार करू नका,माणसाने एवढे सक्षम व्हावे की त्याला मदतीची गरजच भासू नये ,सदाचरणी व्हा, दारू भांग ,अफू ,बिडी ,चिलीम ,असल्या व्यसनात अडकू नका ,व्यसनाने बुद्धी भ्रष्ट होते ,ग्रंथ वाचन करा.दारूबाज ,जुवेबाज,रंडीबाज होऊ नका. कर्ज काढू नका ..असा व्यावहारिक जीवन चांगले जगण्यासाठीचा विचार सावित्रीबाई यांनी दिला.हे विचार आजच्या काळात देखील अतिशय उपयुक्त असून स्त्रियांनी यासाठी जागृती चळवळ कुटुंब व शाळा कॉलेजमध्ये सुरु करावी असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव म्हणाले की कपडे किंवा अलंकार आभूषणे घातली म्हणून आपण बुद्धिमान होतो असे नाही. आज महिलांचे शिक्षण वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील ज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. शिक्षणाचा उपयोग ,स्वतःसाठी व समाजहितासाठी करता आला पाहिजे त्यासाठीची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.’ असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. रोहिणी शिंदे यांनी केले. तर आभार प्रा.सौ.शमीम शेख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ.अश्विनी मोहिते यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील
सर्व प्राध्यापक ,सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होते.