ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण होईल – मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, गडचिरोली, दि.१५: उपजिल्हा रूग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर पैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी देण्यात आले. यातून ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण होईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटीलेटर लोकार्पण करतेवेळी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे आले होते. यावेळी मंत्री श्री.सामंत यांनी दिलेले व्हेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करून आरोग्यसेवेत दाखल करावेत अशा प्रशासनाला सूचना दिल्या. व्हेंटिलेटरच्या लोकार्पणावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्र.जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

विदर्भातील कोरोना संसर्ग यशस्वीरीत्या रोखण्यासाठी प्रशासनाने चांगले कार्य केले आहे. गडचिरोली जिल्हाही यामध्ये आघाडीवर असून जिल्हाधिकारी यांचे पासून ते ग्रामीण स्तरावरील सर्वच यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केलेले आहे असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. प्रशासनाने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आणि पहिल्या लाटेबरोबर दुसरीही संसर्गाची लाट रोखण्यात यश मिळविले याबद्दल सर्वांचे कौतुक मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी केले. येत्या काळातही कोरोनाशी लढायचे आहे, त्यामुळे त्यासाठी तयारी व उपाययोजनाही कराव्या लागणारआहेत असे ते यावेळी म्हणाले.

गोंडवाना विद्यापीठात आढावा बैठक

गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक जागा घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून हे काम झाल्यानंतर विद्यापीठाला खऱ्या अर्थाने फॉरेस्ट आणि ट्रायबल विद्यापीठाचा दर्जा मिळणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी विद्यापीठाचे उप केंद्र सुरू करण्यासाठी चार एकर जागा इंजिनिअरींग कॉलेज मधून घेण्याची मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गडचिरोली येथे सह संचालक कार्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी आज मान्यता दिली. विद्यापीठासाठी प्रलंबित जनसंपर्क अधिकारी पद तात्पुरते भरण्यासाठी पहिल्या तीन महिन्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याबरोबर आरोग्य अधिकारी, कायदे विषयक तज्ञाचीही तात्पुरती पदे भरण्यात येणार आहेत. विद्यापीठांतर्गत इंजिनिअरींग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!