ग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमांची गरज – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मे २०२३ । पुणे । ग्राम विकासाला प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमांमुळे ग्रामीण कामगारांची प्रगती होण्यास मदत होईल, असे विचार राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शिवाजीनगर येथील हातकागद संस्था येथे आयोजित मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मंत्री प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत, खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, खादी ग्रामोद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज आहे. खादी म्हणजे केवळ कापड नसून पर्यावरणाचा संतुलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे साधन आहे. ग्रामीण भागातील कारागिरांना स्वतः पायावर उभे करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता शहरी भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

श्री. साठे म्हणाले, माती कलेला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. खादी हे एक स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत होण्याकडे एक वाटचाल आहे. खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून अशा उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात जिल्हानिहाय मेळावे, प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत.

श्री. बडवे म्हणाले, ग्रामोद्योगमाध्ये ग्रामीण आणि उद्योग या दोन गोष्टींची सांगड आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योजकाला उद्योगाची माहिती मिळण्यास स्वत:बरोबर देशाची प्रगती करण्यास हातभार लागतो. पुरस्कार मिळणे ही एक प्रेरणा असून आगामी काळात चांगले कार्य करण्याची उर्जा मिळते, असेही श्री.बडवे म्हणाले.

नित्यानंद पाटील प्रास्ताविकात म्हणाले, या प्रदशर्नाच्या माध्यातून कुंभार उद्योग व मातीकला उद्योगाशी निगडीत राज्यातील उद्योजक एकत्र आले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन हे उद्योग वाढीसाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महामंडळाच्यावतीने आयोजित निंबध स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग’ या त्रैमासिक अनावरण करण्यात आले. हे प्रदर्शन ३ मे पर्यंत सकाळी १० ते सायं. ८ या वेळेत खुले असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!