
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । सातारा । ‘वक्तृत्व हा केवळ शब्दांचा खेळ नव्हे ,वक्तृत्व म्हणजे गायन नव्हे ,वक्तृत्व म्हणजे केवळ अलंकारिक भाषण नव्हे ,वक्तृत्व हे केवळ सुसाट धावती रेल्वेगाडी नव्हे,वक्तृव म्हणजे लोकांना केवळ घुलवून ठेवण्याचे साधन नव्हे, वक्तृत्व म्हणजे केवळ शब्दांचा दिमाख दाखविणे नव्हे, वक्तृत्व म्हणजे थापा मारून लोकांची फसवणूक करणे नव्हे, वक्तृत्व म्हणजे दांभिकता नसून वक्तृत्व हे व्यक्तीमनाची नैतिक उन्नती करीत असते. वक्तृत्व म्हणजे भांडण नव्हे,वक्तृत्व हा विश्वसनीय अभ्यास असतो. वक्तृत्व हे समाजाला चांगली दिशा देण्यासाठी असते. आरोगंडपणा,आक्रस्ताळेपणा,भंपकपणा असणारे वक्तृत्व दुषित मानसिकतेचे प्रतिक असते. लोकशाही देशात निर्मळपणा,नैतिकता आवश्यक आहे. आपल्या लोकशाही देशाला विश्वासू व विचारवंत वक्त्यांची गरज
आहे असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.ते रहिमतपूर येथे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या डी.एड. कॉलेजने आयोजित केलेल्या ‘वक्तृत्व कौशल्य विकसन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी डी.एड.कॉलेजचे प्राचार्य जे.एन.माने,सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.भाग्यश्री जाधव, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अनेक विद्यालयातील निवडक विद्यार्थी वक्त्यांना वक्तृत्व कौशल्ये आत्मसात व्हावीत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन डी.एड.कॉलेजने केले होते .तर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाच्या विस्तारकार्य कार्यक्रम अंतर्गत वक्तृत्व कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन देण्यासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,प्रा.श्रीकांत भोकरे,तुषार बोकेफोडे ,सोनाली जाधव, समीक्षा चव्हाण,वैभव काटवटे यांनी नियोजन केले होते. कार्यशाळेचे समन्वयक प्रा.संतोष राजमाने हे उपस्थित होते.
वक्तृवाच्या पूर्वतयारी बद्दल मार्गदर्शन करताना डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘’वक्तृत्व केवळ बोलणे नसून श्रोत्यांशी केलेला प्रभावी मानसिक संवाद असतो. वक्तृत्व ही एक साधना असते.त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. विषयासंबंधी अनेकांच्या भाषणांचे श्रवण,विषयाच्या संदर्भ ग्रंथाचे सखोल वाचन,वाचलेल्या आशयाच्या सबंधी चिंतन,,भाषणाचे हेतू समजून घेऊन केलेले सामाजिक निरीक्षण ,समाजातील सर्वसामान्य संकेतांची जाण.औचित्य ,वेळेचे पालन,माहितीची विश्लेषण करण्याची क्षमता, काळ सुसंगत विवेचन ,प्रसंगाला साजेल असा वेश ,वाचिक ,अंगीक ,सात्विक अभिनय ,माणुसकी ,निर्भयता,आत्मविश्वास ,उत्साह ,छोट्या छोट्या गोष्टींचा वापर,योग्य भाषेचा वापर याचा उपयोग करण्याची काळजी प्रत्येक वक्त्याने पूर्व तयारी करताना घ्यायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आवडणाऱ्या वक्त्याच्या शैलीचे अनुकरण हे सुरुवातीस ठीक असले तरी कायमचे अनुकरण न करता स्वतःची शैली तयार करणे चांगले. विविध क्षेत्रातील ज्ञान ,माहिती गोळा करून ती व्यवस्थित जतन करावी. नियमित वर्तमानपत्रे,नियतकालिके वाचावीत.शक्यतो अनेक वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचावेत. अनेक गोष्टींची पुस्तके वाचावीत,वाणी ही सर्वांजवळ आहे पण वक्तृत्व ही कला असून ती सरावाने साध्य होते. संधी म्हणून मिळेल तेंव्हा व्यक्त होत रहावे,भ्रमंती केल्याने विविध अनुभव मिळतात त्यातून ज्ञान मिळते तसे भाषेचे अनेक नमुने मिळतात. वक्तृत्व ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक सशक्त व सामर्थ्यशाली विचार भाषणात असावेत ,ज्याने समाजात नवे चांगले बदल होतील.विद्यार्थ्यांनी केवळ इतिहासतील गोष्टी न सांगता चौफेर लक्ष देऊन वर्तमानकालीन घडामोडी जाणून घ्याव्यात ,अनामिक भीती न बाळगता चांगली मते व्यक्त करावीत असे ते म्हणाले. पहिल्या सत्रात निवडक विद्यार्थी यांची तयारीची भाषणे पाहून त्यांचे मुल्यांकन करण्यात आले.तुषार बोकेफोडे, सोनाली जाधव,समीक्षा चव्हाण,व वैभव काटवटे यांनी विद्यार्थ्यांच्या भाषणातील गुणांचे विवेचन केले, पहिल्या सत्रात प्रशिक्षण देत असताना प्रा.श्रीकांत भोकरे म्हणाले की’वक्तृत्वात वाचन ,मनन ,चिंतन आणि मंथन असते.विद्यार्थ्यांनी भोवतालचे निरीक्षण,वाचन करून सर्वांगाने विचार करून मते व्यक्त करावीत तरच वक्तृत्व कला आत्मसात होईल. आपल्यातील कमकुवत बाजू कोणत्या ते हेरून त्यात दुरुस्ती सुधारणा करण्याचा ध्यास घ्यावा.अभ्यासाला दुसरा पर्याय नाही.अभ्यासानेच वक्तृत्व जोमदार होते असे ते म्हणाले. प्राचार्या डॉ.भाग्यश्री जाधव यांनीही संस्थेतून अनेक वक्ते तयार झाले असून त्यांचा वारसा चालवावा असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन समन्वयक प्रा.संतोष राजमाने यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य
पी.पी.वावरे ,सौ.एस.एम .भोसले ,मा.बी.डी.साळुंखे इत्यादीसह विद्यार्थी उपस्थित होते.