
दैनिक स्थैर्य । 31 जुलै 2025 । मानवी जीवनामध्ये संवादाची फार आवश्यकता आहे. संवाद नसेल तर त्यातून विसंवाद निर्माण होतो. हा विसंवाद टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. योग्य वयात योग्य संस्कार केले पाहिजेत. त्यासाठी घरामध्ये संवादाची फार आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात संवाद दुरावत चाललेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे फलटण शाखेचे माजी अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले.
नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास यावेळी माजी प्राचार्य रवींद्र येवले, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, माणदेशी साहित्यिक व संयोजक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शांताराम आवटे पुढे म्हणाले, जीवन जगताना माणसाने समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी राग, द्वेष,तिरस्कार, अहंकार याचा त्याग करून जीवन हसत खेळत जगले पाहिजे. प्राचार्य रवींद्र येवले यांनी कारगिल दिनानिमित्त शूर जवानांच्यविषयी सद्भावना व्यक्त केल्या. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती नेहमीच सकारात्मक असले पाहिजे.
प्रा सुधीर इंगळे म्हणाले की, सातारा जिल्ह्यामध्ये जे शहीद जवान झाले त्यांच्यामदतीसाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये आपलाही सहभाग असावा. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देऊन लढण्याचे बळ दिले पाहिजे.
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की, आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता मन सुन्न होते. माणूस फक्त धावत आहे. तो सुखाचा विचार करत नाही. सुख म्हणजे घरातल्या सुखवस्तु हीच त्याची कल्पना झालेली आहे. त्यामुळे त्याच्या जीवनातला जगण्याचा आधारच कमी होत चालला आहे. त्यामुळे संवादाची अधिकाधिक गरज आहे. माणसांनी एकत्र आले पाहिजे व व्यक्त झाले पाहिजे.
यावेळी हरिराम पवार, अविनाश चव्हाण, प्रा.अशोक शिंदे, जयदीप भगत, नियत वनक्षेत्राधिकारी अश्विनी शिंदे, अक्षय मखरे, करिष्मा मुलाणी यांनी चर्चेत सहभाग घेतला. तसेच ‘श्रावणात, घन निळा बरसला’ या आशयाच्या कविता सादर करून संवादामध्ये रंगतदारपणा आणला.
कार्यक्रमाचे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. श्रेयश कांबळे यांनी आभार मानले. यावेळी सुरेश भगत, श्रीनिवास लोंढे, सचिन भांडवलकर, नितीन मदने तसेच लेखक, कवी, साहित्यप्रेमी, वाचक, उपस्थित होते.