दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । बौद्धिक संपदा स्वामित्व कायदा व पेटंट मिळविण्याची प्रक्रिया याविषयी संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी यांचेमध्ये जागृती निर्माण करुन देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या क्षेत्रातील नामांकित तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. मृदुला बेळे यांनी केले आहे.
औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, नाशिक येथील या क्षेत्रातील नामांकित तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. मृदुला बेळे मुधोजी महाविद्यालय, फलटण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार मध्ये त्या बोलत होत्या.
बौद्धिक संपदा म्हणजे काय ? ती कशी प्रस्थापित होते ? कॉपीराइट नेमका कशासाठी वापरता येतो ? बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क कायदा कसा आहे याबाबत डॉ. बेळे यांनी सखोल मार्गदर्शन केले व त्यानंतर भारतीय पेटंट कायदे, पेटंट मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया व त्याबाबत येणार्या संभाव्य अडचणी याबाबत त्यांनी आपले अनुभव विषद केले. जागतिकीकरणाच्या युगात बौद्धिक संपदेचे रक्षण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने कोणती काळजी घेतली पाहिजे याचीही माहिती देऊन सहभागी प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन केले.
सदर राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार मध्ये देशभरातून 120 संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. सरिता माने यांनी भूषविले तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. समन्वयक डॉ. संजय दीक्षित यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. ज्योत्स्ना बोराटे यांनी आभार व्यक्त केले. या ऑनलाईन वेबिनारची तांत्रिक बाजू प्रा. सचिन लामकाने यांनी सांभाळली.