दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । मुंबई । अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि प्रदूषण कमी करणे यावर राज्य शासनाचा भर असून वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने शासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरूवात केली असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.
वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि स्वीडन दरम्यान सह्याद्री अतिथीगृह येथे शाश्वतता पुढाकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस स्वीडनच्या मुंबईतील महावाणिज्यदूत एना लेकवल, वाणिज्य दूत एरीक माल्मबर्ग, राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल रोखण्यासाठी महाराष्ट्राने विविध उपाययोजना केल्या आहेत. माझी वसुंधरा, इलेक्ट्रिक वाहन धोरण, उद्योग क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर, ४३ शहरांचा रेस टू झिरो मध्ये समावेश, अर्बन फॉरेस्ट अशा विविध माध्यमातून प्रदूषण कमी करण्याबरोबरच हिरवे आच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वीडनचे या क्षेत्रातील काम पाहता महाराष्ट्र आणि स्वीडन एकत्रितरित्या शाश्वततेच्या दिशेने उत्तम काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे माझी वसुंधरा अभियान, इलेक्ट्रिक वाहन धोरण, अर्बन फॉरेस्ट, किनारपट्टीचे संवर्धन आदी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. शाश्वतता म्हणजे हरित जीवनशैली हे उद्दिष्ट समोर ठेवून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर श्री.अन्बलगन यांनी एमआयडीसीमार्फत अक्षय ऊर्जेचा वापर आणि प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
वातावरणीय बदलांसंदर्भात महाराष्ट्र करीत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा करून स्वीडनच्या महावाणिज्यदूतांनी स्वीडन या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.