लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

विद्रोहीच्या व्याख्यानमालेत डॉ बाबुराव गुरव यांची मागणी

स्थैर्य, सातारा दि. ४ : मुंबईला मोठे करणारया माणसांचा लेखक , क्रांतिकारक कलाकार, शाहीर म्हणून लोकशाहीर कॉ‌.अण्णा भाऊ साठे यांना ओळखले जाते. अण्णा भाऊ हे मुंबईत घडले. त्यांनी मुंबईवर अनेक कथा,  कादंबऱ्या , शाहिरी लिहिली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्र शासनाने द्यावे असे आम्हाला वाटते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते डॉ.बाबुराव गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला व विद्रोही शाहिरी जलसा असा कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्यावतीने लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा होत आहे. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत व लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर व साहित्यावर महाराष्ट्रात प्रथम पीएचडी केलेले डॉ. बाबुराव गुरव यांचे ” शतकांचे नायक – अण्णाभाऊ साठे ” या विषयावर व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रसेनजित गायकवाड,  कार्याध्यक्ष कॉ धनाजी गुरव सरचिटणीस डॉ जालिंदर घिगे , उपाध्यक्ष विजय मांडके आदी उपस्थित होते.

छ. शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर ,  यांच्या नावाने महाराष्ट्रात विद्यापीठे आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी  अण्णा भाऊ आहेत त्यामुळे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे असेही डॉ बाबुराव गुरव म्हणाले. 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने यासाठी सर्व समविचारी संघटना ,  साहित्यिक ,  कार्यकर्ते,  कलाकार यांना बरोबर घेऊन आपली मागणी सरकार दरबारी करावी असे आवाहनही डॉ. बाबुराव गुरव यांनी केले आहे.

जातीच्या , धर्माच्या ,  प्रादेशिक अशा अंगाने मांडणी झाल्यास त्यांना अण्णा भाऊ कळणार नाहीत. धर्मांध, जातीयवादी पद्धतीने त्यांची मांडणी सध्या होऊ लागली आहे. परिवर्तनाची चळवळ गतिमान होण्यासाठी हा अडसर आहे असे सांगून डॉ. बाबुराव गुरव म्हणाले की अण्णा भाऊ साठे हे जातीयवाद्यांचे कधीच नव्हते. त्यांना डोक्यावर नको तर डोक्यात घ्यावे.  त्यांनी सामान्य माणसाला घडवले असे हे व्यक्तिमत्व होते. मराठी साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी पाहून त्यांनी उचलले. विवेकवादी , वैज्ञानिक जाणीव ठेवून , संशोधक वृत्तीने अण्णा भाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार समजून घेणे सध्याच्या काळात गरजेचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!