स्थैर्य, मुंबई, दि.२३: मंगळवारी संध्याकाळी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. तर नायर रुग्णालयात गुडघाभर पाणी शिरले. यामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली. रुग्णालातील साहित्यही या पाण्यावर तरंगताना दिसत आहे. नायर रुग्णालयाला कोविड रुग्णालय घोषित करण्यात आलेले आहे.
मुंबईत रात्रभर तुफान पाऊस बरसला. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरले यामुळे डॉक्टरांची धावपळ सुरू झाली तर प्रशानाची दाणादाण झाल्याचे पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रुग्णालयातील साहित्यही पाण्यावर तरंगताना दिसत आहे.
दरम्यान रात्रभर तुफान पाऊस झाल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यामुळे मुंबई महापालिकेतर्फे सर्व कार्यालयांना सुटी देण्याचे आवाहन केले
आहे.