
स्थैर्य, फलटण, दि.२: काळज ता. फलटण येथील दहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार नुकताच डोळ्या समोर आलेला होता. त्यामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली होती. या चिमुकल्याचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहरीत सापडल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस दलाच्या मार्फत कसून चौकशी करून या चौकशीमध्ये समोर आलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषदेत दिली.
काळजमधील या घटनेनं एक नवीन वळण घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ओमच्या आईवर एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. मात्र, ओमची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. भेटणं बोलणंही टाळत होती. त्यामुळे रागातून या तरुणानं ओमचं अपहरण केलं आणि दोनच दिवसांनी त्याची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणानं ओमची हत्या केली असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. 10 महिन्यांच्या ओंमला अपहरण करण्याचा डाव त्याच्या आईवर प्रेम करणाऱ्या एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून रचला होता. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आणि आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
काळज ता.फलटण जि.सातारा येथील त्रिंबक दत्तात्रय भगत रा.काळज जि.सातारा यांचा लहान मुलगा ओंम त्रिंबक भगत वय १० महिने याचे राहते घरातुन अज्ञात आरोपींनी अपहरण केलेबाबत लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ३५३ / २०२० भादविस कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असुन, एका निरागस लहान बालकाचे अपहरण झाल्यामुळे तसेच परिसरातील लोकांच्या भावना अत्यंत तीव्र असल्याने पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली. गुन्ह्याचे स्वरुप समजावुन घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करण्याचे दृष्टीने हरविलेल्या बालकाच्या तपासासंदर्भात मुद्दयाचे आधारे कार्यप्रणालीनुसार तात्काळ वेगवेगळ्या ११ टीम तयार करुन प्रत्येक टीमला एक उद्दीष्ट ठरवून दिले. अपहरण झालेल्या बालकाचे शेजारील सर्व जिल्ह्यामधील रिमांड होम, बेघर आसरा गृह, सेल्टर होममध्ये शोध घेतला लागलीच सदर बाळाचे फोटोसह शोधपत्रिका तयार करुन संपुर्ण जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये दर्शनी दिसतील अशा ठिकाणी चिटकवण्यात आले. तसेच संपुर्ण राज्यभर सोशल मिडीयावरुन बाळाचे फोटो प्रसारीत करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संपुर्ण परिसरातील सर्व रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सदरच्या घटनेमुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन वारंवार लोकांचे संपर्कात राहुन त्यांना त्यापासुन परावृत्त केले.
गोपनीय बातमीदार तयार करुन त्यांचेकडुन संपुर्ण परिसरात बाळासंबधित व काही महत्वाच्या शक्यता संबधित माहिती गोळा केली. बाळाच्या घराजवळील त्रिंबक भगत यांचे घराचे पाठिमागील शेतात असलेल्या विहिरीत ओंम त्रिंबक भगत वय १० महिने याचे प्रेत पाण्यावर तरंगताना मिळुन आले. दरम्यान बाळाचा शोध घेत असलेल्या पथकांना खात्रीशीर गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदर बाळाच्या आईस एक शेजारील गावातील तरुण मुलगा हा एकतर्फी प्रेमातुन वारंवार तिचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. त्याबाबत संशयित इसमाची संपर्ण माहिती गोळा करुन, सदर संशयित इसमास ताब्यात घेतले व लोणंद पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याचेकडे काळज येथील बाळाच्या अपहरणाच्या अनुशंगाने वेगवेगळ्या मुद्दयांवर विचारपुस केली. परंतु संशयित आरोपी हा खुप चलाखपणे उडवाउडवीची उत्तरे देवुन तपास पथकाची वारंवार दिशाभुल करत होता. स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व तपास पथकाने अत्यंत कौशल्य पुर्ण तपास कौशल्याचा पुरेपुर वापर करुन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संशयित आरोपीकडे विचारपुस करुन आरोपीवर प्रश्नांचा भडीमार केला. सर्वात शेवटी त्याने स्वतःच केलेला मानवतेला काळीमा फासणारा अत्यंत क्रुर गुन्हा हा अपहरण झालेल्या बाळाच्या आईवर करत असलेल्या एकतर्फी प्रेमाच्या रागातुन केला असल्याची कबुली दिली.