दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । फलटण । श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संकलित करापोटी गोळा झालेल्या सहा कोटींचा निधी फलटण नगरपरिषदेने फलटण शहरातील प्रामुख्याने मलठण भागांमधील मूलभूत सुविधांच्या करण्यासाठी वापरावा, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज नेत्यांनी हा निधी राखीव ठेवण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. तरी मुख्याधिकारी तथा फलटणकर नगरपरिषदेचे प्रशासक यांनी सदरील निधीचा वापर फलटण शहरातील मूलभूत सुविधांसाठी करावा, असेही अशोकराव जाधव यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
शहरांमधील विविध विकासकामांसाठी निधी नाही, असे वारंवार बोलले जाते. परंतु सदरील सहा कोटी निधीचा वापर पालखी मार्ग, रस्तांच्या मधील खड्डे व गटारासह आरोग्याचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत व सदरील निधीचा उपयोग हा शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करण्यात यावा, असेही अशोकराव जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे.