स्थैर्य, सातारा, दि. २६ : सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. किरण मदने असे त्याचे नाव आहे.
सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावरील जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी, प्रेमीयुगूल यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटमार करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणार्या टोळीतील टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने, सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने, महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. तथापि, किरण मदने हा फरार होता. त्यास लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक चार दिवसांपासून अथक परिश्रम घेवून त्याचा शोध घेत होते. या पथकाने त्याच्या गावात व नातेवाईकांकडे तसेच तो वावरत असलेल्या परिसराची माहिती घेतली असता किरण मदने ताथवडे घाट परिसरात लपून बसला असल्याचे खात्रीशीर समजले.
त्यानंतर पथकाने तात्काळ त्याठिकाणी सापळा लावला. घाटाच्या कठड्यालगत बाहेरच्या बाजूस असले एका झाडाखाली आरोपी लपून बसलेला दिसला. पोलीस पथक पकडण्यासाठी येत असल्याचे पाहताच आरोपी दरीकडे पळू लागला. पथकातील अंमलदारांनी सुमारे दोन किमीपर्यंत दरीत पाठलाग करून त्यास शिताफीने त्यास पकडले.
किरण मदने याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. आरोपीने योगेश मदने टोळीत राहून सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गवरील जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी, प्रेमीयुगूल यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करत लुटमार करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, मोहन नाचण, पोना शदर वेबले, साबिर मुल्ला, राजकूमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमित सपकाळ पोशि केतन शिंदे, प्रविण पवार, रोहित निकम यांनी सहभाग घेतला होता.