स्थैर्य, दि.२४: यंदा नैऋत्य मान्सून परतीच्या प्रवासास विलंब होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे सप्टेंबरसह ऑक्टोबरमध्येही चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामानतज्ञांनी वर्तवली आहे.
यंदा नैऋत्य मोसमी पावसाचा मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (आयएमडी) १७ सप्टेंबरपासून मान्सून परतीला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही देशाच्या वायव्य भागातून मान्सून परतीला सुरुवात झालेली नाही. त्यातच अमेरिकेच्या नॅशनल प्रिडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात आॅगस्टअखेरपासूनच ‘ला निना’ची स्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात ‘ला निना’चे प्रमाण ७७ टक्के राहील. ‘ला निना’मुळे भारतीय उपखंडात पावसास अनुकूल वातावरण राहील.
मान्सून परतीला विलंब
वायव्य भारतात सलग पाच दिवस पाऊस न पडल्यास मान्सून परतीला सुरूवात झाली असे मानले जाते. मात्र सध्या देशात अनेक भागात मान्सून सक्रिय आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढण्याचे संकेत आहेत. – डाॅ`. रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ.