स्थैर्य, मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन काळात विजेच्या वाढीव बिलासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोना संकटात राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले, परंतु अशा विषयात जनता आणि मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा सूचक इशाराच या पत्रातून देण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वाढीव बिलं पाठवून चांगलाच ‘शॉक’ दिला आहे. कामधंदा बंद असल्यामुळे आधीच चिंतेत असलेला सर्वसामान्य ग्राहक यामुळे अधिकच चिंतातूर झाला आहे. मार्च ते मे 2020 या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भात राज्यभरात आंदोलनंही झाली. शिवाय हा मुद्दा हायकोर्टातही गेला. परंतु उच्च न्यायालयानेही कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
“राज्याला महसुलाची अडचण आहे, पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच या विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून वीजबिलात तात्काळ सूट द्यावी. तसंच भविष्यात ही सूट कोणत्याही प्रकाराने वसूल करायचा प्रयत्न करु नये. याशिवा. सरकारी आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यावा, अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल,” असंही या पत्रात नमूद केलं आहे.