दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एक मानवी कवटी आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळात ही कवटी गायब झाल्याने या कवटीचे वृत्त निराधार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा ही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळल्याने कवटी नक्की कोणाची हे तपासण्याचे आव्हान शहर पोलीसांपुढे निर्माण झाले आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या आवारात गायब झालेली कवटी शुक्रवारी या रूग्णालयाच्या परिसरात आढळून आली. या कवटीची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कवटीचा तपास करण्यासाठी ही ताब्यात घेण्यात आली. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक निंबाळकर म्हणाले, रस्त्याच्या कडेलाच कवटी पडलेली आहे. यांचा योग्य तो पंचनामा करून पुढील तपास सर्व पद्धती वापरून तो तपास करणार आहे. तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात मानवी कवटी सापडल्याचे वृत्त हे चुकीचे, निराधार असल्याचे सांगत दिशाभूल करणारे आहे. या गोष्टीची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. असे सांगणारे डॉ. चव्हाण यांनी शुक्रवारी कवटी सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांच्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने जिल्हा रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.