स्थैर्य , नवी दिल्ली, दि .२५: काेराेना महामारीमुळे देशात अजूनही रेल्वेगाड्या लॉक आहेत. विशेष गाड्या सुरू तर झाल्या, पण लोकांना त्यासाठी दुप्पट भाडे द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे की, सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या मार्चपर्यंत सुरू होऊ शकतील, अशी रेल्वे मंत्रालयाला अपेक्षा आहे. म्हणजे कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे पाहून रेल्वे आता नियमित गाड्या पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यांची सहमती व त्यांच्या मागणीच्या आधारावर रेल्वे फेब्रुवारी-मार्चपर्यंत उर्वरित गाड्या सुरू करू शकते. कोरोनाआधी १२ हजार प्रवासी गाड्या सुरू होत्या. रेल्वे मंत्रालयानुसार, सध्या १७०० मेल-एक्स्प्रेस गाड्यांपैकी ११०० वर गाड्या सुरू आहेत. पाच ते सहा हजार सबअर्बन गाड्यांपैकी ९०% सुरू आहेत. आंतरराज्य गाड्या ३,५०० आहेत, त्यापैकी सुमारे ३०० च सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालय कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन अहवाल देईल.
दिव्य मराठी पडताळणी | विशेष गाड्यांमध्ये द्यावे लागते दुप्पट भाडे
महाराष्ट्र : कमी पल्ल्यासाठीही दुपटीपेक्षा जास्त भाडे द्यावे लागतेय
आधी विविध झोनशी संबंधित २,२२६ गाड्या सुरू होत्या, सध्या १,७४५ आहेत. भुसावळ-मुंबईसारख्या व्यग्र मार्गावरही दुपटीपेक्षा जास्त भाडे आहे. या मार्गावर पॅसेंजरचे भाडे ८५ रु., एक्स्प्रेसचे ३०० आणि फेस्टिव्हल ट्रेनचे ८०० रु. आहे. पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी राज्याने शिफारस पाठवली आहे. राज्य परिवहनच्या १६ हजार बसपैकी सध्या १३ हजार बस सुरू झाल्या आहेत.
हरियाणा : आधी ३८५ एक्स्प्रेस गाड्या सुरू होत्या, आता १२५ गाड्या सुरू आहेत
हरियाणातून जवळपास ३८५ एक्स्प्रेस गाड्या संचालित होत होत्या. सध्या १२५ संचालित होत आहेत. रेवाडी जंक्शनहून दररोज १२० एक्स्प्रेस आणि ५२ पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. सध्या ६८ एक्स्प्रेस सुरू आहेत. राज्यात रेवाडी-दिल्ली हा सर्वात व्यग्र मार्ग आहे. तेथे पॅसेंजरचे भाडे २० रुपये आहे. पण आता प्रवाशांना विशेष रेल्वे गाड्यांमध्ये ४५ रुपये द्यावे लागत आहेत.
छत्तीसगड : पूजा स्पेशलचा विस्तार झाला, पण प्रवाशांवर दुप्पट भारदक्षिण पूर्व-मध्य रेल्वेत ३४३ पैकी ९६ गाड्याच सुरू आहेत. दुर्ग-भोपाळ अमरकंटक एक्स्प्रेस स्पेशलचे रायपूर ते शहडोलसाठी मूळ भाडे १९० रुपये, आरक्षण शुल्क २० रुपये आणि सुपरफास्ट शुल्क ३० रुपये आहे. पूजा स्पेशल म्हणून चालवल्या जाणाऱ्या दुर्ग-निजामुद्दीनचे मूळ भाडे ३६५ रुपये, आरक्षण शुल्क २० रुपये आणि सुपरफास्ट शुल्क ३० रुपये आहे.पूजा स्पेशल रेल्वे गाड्यांचा विस्तार केला आहे.
राजस्थान: कोटा ते सवाई माधोपूरसाठी ३५ रुपयांऐवजी लागताहेत ८० रुपये
पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा मंडळातून रोज ६५ मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. त्यात एकही पॅसेंजर ट्रेन नाही. मथुरा-नागदा सर्वात व्यग्र मार्ग आहे. विशेष गाड्यांत जयपूर-मुंबईसाठी लोकांना दुपटीपेक्षा जास्त भाडे द्यावे लागत आहे. कोटा-सवाई माधोपूरदरम्यान ३५ रु. ऐवजी ८० रुपये शुल्क लागत आहे. आधी कोटाहून रामगड मंडीपर्यंत एक्स्प्रेसचे भाडे ३५ रुपये होते, ते आता ४५ रुपये झाले आहे.
मप्र: लांब पल्ल्याच्या गाड्यांत २०० ते ८०० रु. अतिरिक्त शुल्क द्यावे लागते
आधी पश्चिम मध्य रेल्वे झोनच्या मार्गावर ६०८ मेल-एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या होत्या. सध्या तीन मंडळांत १६२ च सुरू आहेत. गोरखपूर, लखनऊ, वाराणसी मार्गावर भाडे सामान्य आहे. फेस्टिव्हल स्पेशल आणि इतर मार्गांवरील गाड्यांत लांब पल्ल्याचे २०० ते ८०० रु. अतिरिक्त शुल्क आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निरंजन वाधवानी यांच्यानुसार, नियमित गाड्या सुरू करण्यासाठी पत्र लिहिले जाईल.